देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 30 ऑक्टोबर: (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील नागरिकांवर मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू झाला आहे. शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या तसेच पहाटेच्या वेळी फिरणे अवघड झाले असून लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिक दररोज भयभीत जीवन जगत आहेत. या वाढत्या त्रासाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या वतीने व साईराम सोसायटीच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे, जेष्ठ नेते संजय ताकवले, विजयराव वडागळे, शहर संघटक सनी माघाडे, आसिर सय्यद, ज्ञानेश्वर बिमन, श्रीपाद वाघमारे, दिनेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या दरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध नोंदवला.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, अनेक अपघातसदृश घटना घडत आहेत. विशेषतः नगर–कल्याण रोडवरील साईराम सोसायटी परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास अत्यंत तीव्र असून, या परिसरातील रहिवासी दररोज भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.
मागील काही महिन्यांत साईराम सोसायटी परिसरात दोन बालकांना आणि दोन वयोवृद्धांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. कालच पुन्हा एका सात ते आठ वर्षांच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातही याच मागणीचे निवेदन मनपा प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मनपा प्रशासनाने तातडीने कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदारांना आदेश देऊन मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करावी. अन्यथा रिपब्लिकन सेना उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे अनेक भागात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाने यावर तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा