देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: (प्रतिनिधी)- कचरा संकलन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून मनपाने संपूर्ण शहराचीच कचराकुंडी करत नगरचा नरक केल्याचा हल्लाबोल करत चित्रा टॉकीज परिसराची पाहणी करताना दुर्गंधीयुक्त कचरामय झालेला रस्ता तात्काळ स्वच्छ न केल्यास मनपा समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी दिला होता. काळे यांनी दिलेल्या दणक्यानंतर खडबडून जागे होत मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करत ४८ तासांच्या आत सदर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता मोहीम राबवली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.याबाबत माहिती देताना कामगार सेना आघाडीचे शहर प्रमुख गौरव ढोणे म्हणाले, परिसरातील नागरिकांनी किरण काळे यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर काळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मनपा प्रशासनाला धारेवर धरत शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. घनकचरा विभागाच्या या सकारात्मक कृतीचे आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो.
घंटागाडी येत नाही ? ठाकरे शिवसेनेशी संपर्क करा :
युवासेना विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड म्हणाले, मनपाने शहरातील कचरा संकलनासाठी खाजगी ठेकेदार संस्थेची नियुक्ती केलेली आहे. लाखो, कोट्यवधी रुपयांचे बिल यासाठी नागरिकांकडून संकलित केलेल्या करा मधून अदा केले जाते. शहराच्या बहुतांशी भागामध्ये एक दिवसा आड घंटागाडी येते. मात्र अनेकदा ठेकेदार कामचुकारपणा करत दोन – दोन, चार – चार दिवस कचरा संकलनासाठी जातच नाहीत. यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना कचरा घरातील दुर्गंधी व रोगराई टाळण्यासाठी रस्त्यावर टाकावा लागतो. शहराच्या कोणत्याही भागात जर घंटागाडी दिवसाआड आणि वेळेवर येत नसेल तर नागरिकांनी शहर ठाकरे शिवसेनेची हेल्पलाईन असणाऱ्या शहर प्रमुख किरण काळे यांच्या ९०२८७२५३६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन सुनील भोसले यांनी केले आहे. संपर्क साधल्यास शिवसेना या कामी जातीने लक्ष घालेल, असे गणेश आपरे यांनी म्हटले आहे.
…अन्यथा बिलं अदा करू देणार नाही :
शहर स्वच्छता अभियानात मनपाला लाखोंची पारितोषिके जरी मिळाली असली तरी तो केवळ कागदोपत्री सन्मान आहे. प्रत्यक्षात शहरात कचरा संकलनाचा पूर्णत: बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शहराच्या बहुतांशी भागामध्ये जागोजागी कचराच कचरा आढळून येत आहे. पुढील पंधरा दिवसांच्या आत कचरा संकलन प्रक्रियेत ठेकेदार संस्थेने सुसूत्रता आणत आपली जबाबदारी चोखरित्या बजावली नाही तर नगरकरांच्या कर संकलनातून ठेकेदाराला अदा केली जाणारी लाखो, कोट्यावधी रुपयांची बिलं शहर प्रमुख काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे लेखी हरकत घेत ठाकरे शिवसेना प्रशासनाला अदा करू देणार नाही, असा इशारा विलास उबाळे यांनी दिला आहे. नागरिकांना सातत्यपूर्ण, सुरळीतपणे सेवा मिळावी याकरिता घनकचरा विभागाच्या कामावर या माध्यमातून ठाकरे शिवसेना निगराणी ठेवणार असल्याचे प्रशांत (पप्पू) ठुबे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा