‘लोक अदालती’ मध्ये संगमनेर पंचायत समितीची ६० लाखाची वसूली तालुका जिल्ह्यात प्रथम

शिर्डी, १३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) – संगमनेर पंचायत समितीच्या वतीने आयोजित लोक अदालतीमध्ये विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी ची सुमारे ६० लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वाधिक वसूली मानली जाते आहे.
याकामी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. येत्या काळात उर्वरीत रक्कम वसूलीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.
संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीकडील घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी होती. त्या थकबाकीदार असलेल्या १० हजार २२० खातेदाराना थकबाकी भरणा करण्याबाबत कोर्टामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २ हजार २४७ इतक्या खातेदारांनी तडजोडी अंती ५९ लाख १३ हजार ९६० रुपयांचा भरणा केला आहे.
संगमनेर तालुक्याची अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वसुली झालेली आहे. या कामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रथम श्रेणी. वाय. एच. अमेठा, वरिष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एच शेख, वरीष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधिश एस.एस.बुद्रुक, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.डी.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका बार असोशिएशनचे वकील विनोद ढोमसे, फंटागरे यांच्या सहकार्यांने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या संदर्भाने न्यायाधीशांनी नुकताच पंचायत समितीचे सभागृहामध्ये खास वेळ देऊन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून जास्तीत जास्त वसुली कशी करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पंचायत समिती मार्फत उत्तम कामगिरी केली जाईल. याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने व्यक्तिशः लक्ष घालून उच्चांकी वसुली होईल. या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर वसूली करण्यात यश मिळाले आहे.
यासाठी तालुक्यातील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कक्ष अधिकारी राजेंद्र तिटमे, विस्तार अधिकारी पंचायत राजेंद्र कासार, राजेंद्र ठाकूर, सुनील माळी, सदानंद डोखे यांनी परिश्रम घेतले.
गावच्या विकासात ग्रांमपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. मात्र जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभाल लागण्यास मदत होते.
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्याला तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
सर्वाधिक वसूली झालेल्या ग्रांमपंचायतीमध्ये घुलेवाडी ७ लाख ६१ हजार ५४७, आश्वी बु ५ लाख ७९ हजार, पेमगिरी ५ लाख ५१ हजार १२४, गुंजाळवाडी ४ लाख ८५ हजार ८०३, सुकेवाडी ३ लाख ८४ हजार ५०, वेल्हाळे ३ लाख ५६ हजार ८०, आंबी खालसा २ लाख ७१ हजार ५१३, समानापूर १ लाख ९४ हजार ९४०, निमगाव जाळी १ लाख ७८ हजार ४६६, मंगळापूर १ लाख १३ हजार २३५ वसूली करण्यात आली आहे. १९ ग्रांमपंचायतीच्या वसूली शुन्य झाल्या आहेत.