विनोदाशिवाय जीवन नाही – मिर्झा बेग
पीस फौंडेशन’ व ‘गोल्डन बेल’ आयोजित नगरी हास्य उत्सवास नगरकरांची दाद

अहमदनगर दि.२२ (प्रतिनिधी) – विनोद हे तणावनाशक औषध आहे. या ताणतणावाच्या जीवनात देखील माणसाला विनोद बुद्धीचा वापर करता आला पाहिजे. विनोदाचा आनंद व आस्वाद घेता आला पाहिजे. यामुळे जीवन अधिक सुसह्य होईल. विनोदाशिवाय जीवन नाही, असे प्रतिपादन झागंडगुत्ता फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (अमरावती) यांनी केले. होळी उत्सवानिमित्त
हसता हसता धम्माल करणारा ‘नगरी हास्य उत्सव’ या होळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
याप्रसंगी हास्यसम्राट फेम प्रा. संजय कळमकर व रमेश जैन (धुळे) यांनी देखील आपले हास्य व्यंग सादर करीत श्रोत्यांचे भरपूर मनोरंजन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार प्रमोद कांबळे, जयंत येलूलकर, स्मिता पानसरे, क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुथा, अॅड. श्याम आसावा डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम केडगाव लिंक रोडवरील आयएमए भवन येथे संपन्न झाला.
डॉ. मिर्झा पुढे म्हणाले की, विनोदाची जीवनात कमतरता नसते. छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा विनोद निर्मिती होते, असे ते म्हणाले.
प्रा. संजय कळमकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात विनोद आहे. आजकालच्या बातम्यांत देखील खूप विनोद आहे. तो घेता यावा आणि जीवनाचा खरा आनंद लुटता आला पाहिजे.
प्रास्ताविकात अर्शद शेख म्हणाले की, सामाजिक सद्भभावना वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी होळीनिमित्ताने हास्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाचे संयोजन पीस फौंडेशन व गोल्डन बेलबरोबरच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् (अहमदनगर सेंटर), क्रेडाई अहमदनगर, शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, हायराईस कन्स्ट्रक्शन्स, रुचिरा स्वीटस् आणि आकांक्षा कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पलुसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी डिक्रुझ, प्राचार्य खालीद जहागिरदार, डॉ. प्रशांत शिंदे, शेख रिजवान हनीफ, शेख सईद, आर्किटेक्ट संतोष गायकवाड, अमित धोकरिया आणि इंजि. इम्तियाज शेख आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.