शहरातील गुंडगिरी, ताबेमारीची शिवसेना नेते खा. राऊतांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंनी फाईल देत केली चर्चा भगवी शाल घालत खा.राऊतांचे काँग्रेसच्या वतीने काळेंनी केले स्वागत

अहमदनगर दि. 28 जानेवारी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत नगर शहर दौऱ्यावर आले होते. हॉटेल यश ग्रँड येथे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी नगर शहरातील राजकीय गुंडगिरी, शैक्षणिक संस्थांच्या भूखंडांसह अन्य भूखंडावर होणारी ताबेमारी याबद्दलची कागदपत्रे, पुराव्यांसह फाईल देत सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या बद्दलचे सविस्तर पत्र काळे यांनी यावेळी राऊत यांना दिले. विविध राजकीय मुद्द्यांवर देखील यावेळी बातचीत झाली. चर्चेचा सविस्तर तपशील समजून शकला नसला तरी महाविकास आघाडी, आगामी लोकसभा निवडणूक यासह जिल्ह्यातल्या महायुतीचा सामना एकजुटीने करण्याबाबत यावेळी उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहरातील राजकीय गुंडगिरी, ताबेमारीवर जोरदार हल्लाबोल केला. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. किरण काळे भेटीनंतर बोलताना म्हणाले की, स्व.अनिलभैय्या राठोड आज हयात नसले तरी असे कोणीही समजू नये की शहर पोरके झाले आहे. स्थानिक पातळीवर आम्ही गुंडगिरी, ताबेमारीच्या विरोधात निर्भीडपणे दररोज आवाज उठवत आहोत. यापूर्वी अनेक वेळा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी देखील शहरातल्या गुंडगिरी विरुद्ध तोफ डागली आहे. शिवसेना नेते खा.राऊत यांनी देखील याबाबत दिलेला इशारा संबंधितांनी समजून घेतला पाहिजे. शहरातल्या राजकीय गुंडगिरीचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काळे यांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खा. राऊत यांना भगवी शाल घालत काळे त्यांचे ऐतिहासिक नगर शहरात काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. या वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला, संजय राऊत आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, किरण काळे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेसकडून करण्यात आलेल्या जंगी स्वागतामुळे त्याची जोरदार चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. मागील आठवड्यात जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आ. सुनील शिंदे आणि किरण काळे यांच्यामध्ये बंद दारा आड चर्चा झाली होती. आ.शिंदे यांनी काळे यांना खा.राऊतांच्या भेटीचे निमंत्रण दिले होते. ते स्वीकारत काळे यांनी कार्यकर्त्यांसह राऊत यांची भेट घेतली.
जिंदादिल माणूस :
किरण काळे म्हणाले, संजय राऊत हे जिंदादिल माणूस आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत त्यांची जडणघडण झालेली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते म्हणून त्यांच्याकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहतात. त्यांच्याशी बोलून प्रचंड ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात नगर शहरासह जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सक्षमपणे महायुतीचा सामना करत विजयाचा झेंडा रोवेल.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला, माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, उपाध्यक्ष अलतमस जरीवाला, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, केडगाव उपनगर काँग्रेसचे किशोर कोतकर, सावेडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, उपाध्यक्ष निजाम जहागिरदार, सचिव शंकर आव्हाड, सहसचिव रोहिदास भालेराव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, अजय मिसाळ, राहूल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————