चितळी शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

पाथर्डी दि.१० मार्च (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील
चितळी येथे प्राथमिक शाळेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बचत गटाच्या अध्यक्षा पार्वती शिंदे होत्या. त्या म्हणाल्या स्त्रीशक्ती खूप मोठी असते परंतु अजूनही स्त्रीया आपली शक्ती ओळखून वागत नाहीत. एक स्त्री साक्षर झाली तर ती संपूर्ण कुटुंब साक्षर करू शकते. आपले अधिकार तिला माहित होतात. म्हणून स्त्रियांनी पुढे आले पाहिजे. विविध माध्यमातून आपला ठसा उमटवला पाहिजे. या वेळी बचत गटाचे महत्त्व त्यांनी सांगितले .
प्रा.ज्योती पवार म्हणाल्या आज सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीयांनी भरारी घेतली आहे. त्यांच्या या यशाच्या मागे पुरुषही आहेत. पुरुषाशिवाय स्त्री अधुरी आहे. म्हणून पुरुषांचाही स्त्रीयांनी सन्मान केला पाहिजे .
मंगल म्हस्के यांनी नारीशक्ती विषयी व बचत गटाविषयी माहिती सांगितली. सर्व महिलांना एकत्र आणून शाळेने आमचा सन्मान केल्यामुळे मी भारावून गेले असे उदगार काढले.
यावेळी वर्षा कदम , योगिता जाधव , संगिता कोठुळे , मंदाकिनी गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
तसेच महिला दिनानिमित्त कुमारी वैष्णवी देशमाने या विद्यार्थिनीचा इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला .उपसरपंच सुवर्णा कदम , बचत गटाच्या अध्यक्षा पार्वती शिंदे , ज्योती कुटे , शाळेतील सर्व शिक्षिका , अंगणवाडी सेविका , मदतनीस यांच्यासह विविध महिलांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ , राणी लक्ष्मीबाई , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले , कल्पना चावला , इंदिरा गांधी , प्रतिभाताई पाटील अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांची वेशभूषा करून त्यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून सांगितली.
प्रास्ताविक अनुपमा जाधव यांनी केले . सूत्रसंचालन सविता राजपूत व सोनाली ससाणे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कैलास सदामत , महादेव कौसे , मेहताब लदाफ यांनी प्रयत्न केले .