दहिगाव जि. प. शाळा बांधकामाचे तांत्रिक परीक्षण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांच्या आंदोलनाची दखल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी वेधले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी) : दहीगाव (ता. नगर) जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधकामाला तडे गेले असून निंबोडी शाळेसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी व्यक्त केली असून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, म्हस्के यांच्या उपोषणाला शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पाठिंबा देत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. मु.का. अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ शाळा बांधकामाचे तांत्रिक परीक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
म्हस्के हे सोमवार सकाळपासून जिल्हा परिषद आवारात विविध मागण्यासाठी उपोषणास बसले आहेत. निकृष्ट शाळा बांधकाम, विद्यार्थी सुरक्षितता ही त्यांची मुख्य मागणी आहे. तसेच मागील ११ -१२ वर्षांपासून गावात एकच ग्रामसेवक या पदावर कार्यरत असून यामुळे त्यांचे गावात हितसंबंध निर्माण झाले असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रश्न रखडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी उपोषणकर्त्यानी केली आहे.
नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी थम मशीन बसवण्यात येऊन यावर जिल्हा परिषदेने तसेच पंचायत समितीने देखरेख ठेवावी. जेणेकरून ग्रामस्थांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थिती राहू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे. दहिगावच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर जिल्हा परिषद पुढील काय कार्यवाही करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावेळी काळे यांच्यासह नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण गीते पाटील, उमेश साठे आदी उपस्थित होते.