सामाजिक

28 वर्षांनंतर पुन्हा एकदा वाजली शाळेची घंटा श्री मार्कंडेय विद्यालय 1995 बॅचचा स्नेहमेळावा

नगर, दि. 24 (प्रतिनिधी)- फुग्यांची कमान, फुलांचे तोरण, सडा-रांगोळी अन् तुतारीच्या निनादात 234 माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा श्री मार्कंडेय विद्यालयात हजेरी लावली. तोच वर्ग, तीच तुकडी आणि तेच बँच, तेच सवंगडी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र जमले.
या वेळी संस्थेचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्दम, शिक्षक बाळकृष्ण गोटीपामूल, शिक्षिका सुरेखा आडम यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. जुन्या आठवणी सांगताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे डोळे पाणावले. स्नेहमेळाव्याचे आयोजन हॉटेल व्ही स्टार येथे करण्यात आले होते. मुख्याध्यापक संदीप छिंदम, बाळकृष्ण सिद्दम, कुमार यन्नम, बाळकृष्ण गोटीपामूल, पांडुरंग गोणे, रावसाहेब क्षेत्रे, जगदाळे, अनुराधा मिसाळ, शकुंतला अरकल, शकुंतला सिद्दम, सुरेखा आडम, नजमा शेख, रत्नमाला दासरी, रंजना गोसके, आशा येनगंदुल, अर्चना साळुंके, गांगर्डे, रेणूका खरदास यांच्यावर फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते सरस्वतीपूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
या वेळी संस्थेचे माजी मुख्याध्यापक सिद्दम म्हणाले, विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत हे अविस्मरणीय असून 28 वर्षांपूर्वीची या बॅचमधील विद्यार्थी आजही त्याचप्रमाणे आज्ञाधारक आहेत. त्यांच्यात शिकण्याची आजही तीच जिज्ञासा दिसून आली. तास सुरू असताना विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि पूर्वीचा तोच खोडसाळपणाही जाणवला. शिक्षणाविषयी प्रेम, आदर दिसून आला. 1995 ची बॅचचा निकाल विक्रमी होती. ही बॅच स्कॉलर असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जुन केला. व्यासपीठावरील उपस्थित शिक्षक-शिक्षक हे शिलेदार तर आपण मावळे आहोत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
माजी विद्यार्थी तथा माजी नगरसेवक अनिल बोरुडे, नगरसेवक मनोज दुलम, निलेश वाघमारे, कल्पना पोटघन, अमोल भांबरकर, मोहिनी भुजबळ, आनंद नक्का, नगरसेविका पुष्पा बोरुडे आदींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रकला शिक्षक कुमार यन्नम यांनी माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्दम यांचे रेखाटलेले स्केच सिद्दम यांना भेट दिले. माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची भेट देण्यात आली. प्रस्ताविक सुहास ढुमणे यांनी केले. सूत्रसंचालन विजय साबळे यांनी तर आभार पूनम कोंडा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी मंदार अडगटला, विनोद भिंगारे, वैभव सैंदाणे, राजेश नाईक, भास्कर कोडम, नाना मादास, सुहास रज्जा, संतोष यंगल, मनोज बोज्जा, दिपाली मंगलारप आदींसह सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे