ब्रेकिंग

प्रशासनाशी चर्चा फिस्कटली, कामगारांचा बाजारपेठेतून भव्य आक्रोश मोर्चा उद्या धडाडणार

अहमदनगर दि. 14 डिसेंबर (प्रतिनिधी) : रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या थकीत वेतन वसुली संदर्भातील चर्चेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या दालनामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्यासह रेल्वे मालधक्का कामगार, जिल्हा माथाडी काँग्रेस विभाग प्रतिनिधी यांची झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे फिस्कटली आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी कामगारांचा बाजारपेठेतून भव्य आक्रोश मोर्चा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीत निघणार असल्याची माहिती माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी किरण काळे यांनी जिल्हा प्रशासनासह माथाडी मंडळाला धारेवर धरले. प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र प्रशासनाने वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचे मोघम उत्तर दिले. अन्य प्रश्नांची उत्तरे देताना उडवा उडवीची उत्तरे दिली, असा आरोप कामगारांनी केला आहे. कामगारांना न्याय देण्या ऐवजी महसूल मंत्री आपल्या महसूल विभागाच्या माध्यमातून मुठभर ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. हे दुर्दैवी आहे, असे म्हणत कामगारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल. त्यामुळे मोर्चा निघणारच, असा इशारा देत यावेळी काळे, उबाळे, भिंगारदिवे यांच्यासह उपस्थित कामगार प्रतिनिधी निषेध करत बैठकीतून उठून गेले.

यावेळी अहमदनगर माथाडी मंडळाचे सचिव प्रमोद बोरसे, कामगार अधिकारी प्रदिप जगधने, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, कामगार प्रतिनिधी रोहिदास भालेराव, किशोर जपकर, मंगेश एरंडे, अनिल जपकर, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागळ, जयराम आखाडे, गणपत वाघमारे, दीपक काकडे, सचिन लोंढे आदी उपस्थित होते.

विलास उबाळे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून कामगारांनी संयम पाळला आहे. निवेदने, धरणे, आंदोलन, उपोषण, मुंडन आंदोलन, कागदोपत्री निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, बैठका अशा विविध माध्यमातून प्रशासना कडून कामगारांना न्याय मिळावा म्हणून दोन वर्षे प्रयत्न केले. मात्र माथाडी मंडळ, जिल्हा प्रशासन आणि मूठभर ठेकेदारांना जिल्ह्यातल्या बड्या नेत्याचं कवच आहे. त्यांना गोरगरिबांच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर आनंद साजरा करायचा आहे. मात्र कामगार बांधव दुःखात आहे. त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी बायका, पोरांसह कामगारांनी मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील भिंगारदिवे म्हणाले, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता जुन्या माळीवाडा बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन केले जाईल. मोर्चा शनि चौक, चौपाटी कारंजा, नेता सुभाष चौक, तेली खुंट मार्गे भिंगारवाला चौकात चौक सभेद्वारे विसर्जित होईल. त्यानंतर निवडक कामगारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर करतील. मोर्चा लोकशाही मार्गाने, संविधानिक पद्धतीने, कायदा सुव्यवस्थेचे पालन करून पार पडेल. पोलीस प्रशासनाने देखील मोर्चाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कामगारांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी दुपारी किरण काळे यांच्या उपस्थितीत कामगारांची बैठक पार पडली. कामगारांनी दुसऱ्या दिवशी देखील काळा फिती बांधून आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला एफसीआय, नगर तहसीलदार, रेल्वे प्रशासन आणि हुंडेकरी यांना पाचरण केल्याची माहिती कामगारांना दिली होती. मात्र त्यांना ते बैठकीला न आल्याबद्दल कामगारांनी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी, हुंडेकरी तसेच जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध केला.

कामगारांचा व्यापाऱ्यांना पाठिंबा :
किरण काळे यांनी शहरातील मनपाने सुमारे ४० हजार व्यापारी, दुकानदारांवर लादलेल्या जाचक परवाना शुल्क वसुली विरोधात काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले आहे. मोर्चेकरी कामगारांच्या वतीने समारोपाच्या चौक सभेमध्ये काळे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने शहरातील तमाम व्यापारी, दुकानदारां कडून करण्यात येणाऱ्या जाचक वसुलीचा निर्णय मनपाने रद्द करावा या मागणीला कामगारांच्या वतीने पाठिंबा देणार असल्याची माहिती विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे