जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय उपअभियंता यांच्या दालनात चप्पल हार घेऊन ठिय्या आंदोलन

अहमदनगर दि.5 डिसेंबर (प्रतिनिधी)- नगर शहारालगत असणाऱ्या शहापूर येथे रस्त्यावरील खड्ड्यात पडून दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी शहापूर येथील २० वर्षीय आदित्य नाटक या युवकाचा मृत्यु झाला. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी देखील याच युवकाचे वडील देखिल त्याच ठिकाणी असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यु मुखी पडले होते. याचाच अर्थ मागील ४ वर्षांपासून शहापूर ते मेहकरी गावा दरम्यान असलेले खड्डे आज पर्यंत बुजवले गेले नाहीत. परिणामी अनेक निष्पाप व्यक्तींनी केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे आपले प्राण गमावले आहेत. मागील ३ ते ४ वर्षांपासून कल्याण- अहमदनगर – नांदेड या राज्य महा मार्ग २२२ चे काम संथ गतीने वेगवेगळ्या भागात सुरू होते. परंतु ठेकेदाराच्या वेळ काढू पणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम मागील वर्षी अर्ध्यावरच सोडले. आज पाथर्डी ते मेहेकरी गावा दरम्यान जो नव्याने रस्ता तयार करण्यात येत आहे त्या कामाची निविदा हि पुर्ण पणे वेगळी असल्याने त्यात या भागाचे काम येतं नाही. त्यामुळे शहापूर ते मेहेकरी दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्या साठी राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर (NHAI )यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्याने या रस्त्यावरचे खड्डे हे केवळ मुरुमानेच बुजवले जात असल्याच्या निषेधार्थ जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर चे उपविभागीय अभियंता दी. ना. तारडे यांच्या कार्यालयावर चप्पलचा हार घेऊन आंदोलन करण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी येणाऱ्या २८ डिसेंबर २०२३ या तारखेच्या आत सदरच्या रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने, आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत सर्पमित्र कृष्णा बेरड, राहुल पोटे, अमित गांधी, शहानवाज शेख, ओम बडे, तबाजी गाडेकर, अविनाश बेरड, ऋषिकेश खामकर, सचिन फल्ले ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने २८ डिसेंबर नंतर सदरचे खड्डे न बुजवल्यास संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना चपलाचा हार घालण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला.