टाकळी काजी ते भातोडी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय उपअभियंता यांना निवेदन

अहमदनगर दि. 1 डिसेंबर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील टाकळी काजी ते भातोडी गाव दरम्यान नगर शहरातील हद्दीमध्ये साधारण ८ किलोमीटर एवढे रस्त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे. सदर रस्त्यासाठी शासनाने मागील वर्षांमध्ये ४ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला व रस्त्याची निविदा होऊन जवळपास आजपर्यंत १० महिने एवढा कालावधी झालेला आहे. वर्षभरापूर्वी निविदा होऊन निधी येऊन ठेकेदार नेमून देखील रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत असल्याच्या निषेधार्थ जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता संजय भावसार यांना निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी व वेळ काढून पणामुळे निधी मंजूर असतानाही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गावातली सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून दळणवळण करताना अनेक खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे नागरिकांना आश्वासन दिले होते. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामूळे आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन आपला जीव गमावलेला आहे. त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करावी तसेच येणाऱ्या १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम करावे अन्यथा १६ व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.