सहाय्यक कामगार आयुक्तांना “या” पक्षाच्या कामगार आघाडीने घातला घेराव, अधिकाऱ्यांची उडाली भांबेरी दोन आठवड्यात वसुली न झाल्यास कामगार आक्रमक भुमिका घेण्याच्या तयारीत

अहमदनगर दि. 7 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जाणीवपूर्वक ठेकेदार, हुंडेकरांना पाठीशी घालत आहे. कामगारांच्या घामाचा, कष्टाचा मोबदला दिला जात नाही. मागील सुमारे अडीच वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचे दरवाढीसह थकीत असणाऱ्या वेतन वसुली कामी चालढकल केली जात आहे. कामगार विभाग व महसूल प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून बोळवण करत आहेत. दोन आठवड्यात वसुली करून कामगारांच्या खात्यावर वसुलीची रक्कम जमा करा. अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा अहमदनगर काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीत माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांनी जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी केली. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले, माथाडी मंडळाचे सचिव बोरसे यांना कार्यालयात घेराव घालण्यात आला. यावेळी काळेंसह उबाळे, भिंगारदिवे, कामगारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले. यावेळी कवले, बोरसे यांची चांगलीच भांबेरी उडाली. तर काही अधिकाऱ्यांनी कामगार भेटीला येत आहेत हे समजताच कामगार येण्यापूर्वीच कार्यालयातून पळ काढला.
कामगार प्रशासना समवेत झालेल्या चर्चेनंतर बोलताना किरण काळे म्हणाले की, कामगारांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. तारीख पे तारीख देऊन दिशाभूल केली जात आहे. माथाडी मंडळ नेमके कामगारांच्या हितासाठी काम करते की मुठभर भांडवलदारांसाठी असा मूलभूत प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. काँग्रेसचा माथाडी कामगार विभाग रेल्वे मालधक्क्यासह शहरातील सर्वच कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दरवाढीसह थकीत वेतन वसुली कामी आता कोणत्याही परिस्थितीत मंडळाला पळ काढून दिला जाणार नाही. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून कामगारांच्या पाठीशी बळ उभे केले जाईल.
विलास उबाळे म्हणाले, आम्ही पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कामगार व महसूल प्रशासन एकमेकांकडे बोट न दाखवता आपापसामध्ये समन्वय ठेवावा. तो त्यांना ठेवता येत नसेल तर त्याला कामगार जबाबदार नाहीत. महसूल विभाग वसुली कामी सहकार्य करत नाही. असे कामगार विभागाचे म्हणणे आहे. महसूल मंत्री जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. असे असतानाही कामगारांना न्याय मिळत नसेल तर आक्रमक भूमिका घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माथाडी काँग्रेस विभाग वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल.
सुनील भिंगारदिवे म्हणाले, अडीच, तीन वर्षे उपोषण, आंदोलन, पत्रव्यवहार, बैठका, पाठपुरावा करून देखील कामगारांच्या घामाचा पैसा दाबून ठेवला जात असेल. कामगारांकडून इथून पुढे प्रशासनाने संयमाची अपेक्षा करू नये. पिळवणूक थांबवली जात नसेल तर लोकशाही मार्गाने कामगारांना हक्काच दाम मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल.
यावेळी जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, रोहिदास भालेराव, सचिन लोंढे, भाऊसाहेब कोतकर, राजेंद्र तरटे, पंडित झेंडे, बबन डांगे, बाळु अनारसे, अशोक रासकर, संतोष गायकवाड, विलास गुंड, भगवान शेंडे, रवी शेंडे, संतोष वाघमारे, अर्जुन जाधव, सचिन वाघमारे, राधेश भालेराव, दिपक काकडे, अमोल डांगे, महादेव कोहक, संजय माळवदे, संतोष भालेराव, विजु कार्ले, अनिल कार्ले, अनिल लाळगे, हरुन पठाण, अंबादास म्हस्के, रामदास दारकुंडे आदींसह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.