उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार एका छताखाली योजनांचा लाभ मिळणार
अहमदनगर दि. 18 (प्रतिनिधी):- अहमदनगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उद्या, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत . यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगर येथील सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.
नगर-मनमाड रोड, सावेडी बसस्थानकाशेजारी, अहमदनगर येथे हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन समारंभास खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे प्रमुख अधिकारी याप्रसंगी उपस्थित असणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रक समाजकल्याण विभागाचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर, अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे हे आहेत.
समाजकल्याण विभागाशी संबंधित सर्व कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात एका छताखाली आल्यामुळे लाभार्थ्यांना इतरत्र होणारी पायपीट वाचणार आहे. एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे. अशी प्रतिक्रिया राधाकिसन देवढे यांनी दिली आहे . या सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय संघटनांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.