लढा अजून संपलेला नाही, ही तर सुरूवात आहे किरण काळेंचे सोशल मीडियाद्वारे नगरकरांना भावनिक आवाहन

अहमदनगर दि.21 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : सिताराम सारडा विद्यालयाच्या परिसरातील तो बहुचर्चित पान स्टॉल कायमस्वरूपी बंद करत शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. अखेर जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, पोलीस, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन कार्यालय हे सर्व विभाग खडबडून जागे झाले. कडक कारवाई झाली. अखेर मोहिमेला यशही आले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. मात्र आता शहरातील शाळा, महाविद्यालयांचा १०० मीटरचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी काँग्रेसने मोहीम छेडली आहे. सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये यासाठी किरण काळे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस मोहीम राबविणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत यांनी दिली आहे.
दरम्यान, काळे यांनी “लढा अजून संपलेला नाही, ही तर सुरुवात आहे” या मथळ्याखाली समाज माध्यमांवरून नगरकरांना जाहीर भावनिक आवाहन करत पोस्ट लिहिली आहे. ती चांगलीच व्हायरल होत आहे. या अभियानात जोडून इच्छिणाऱ्यांसाठी संपर्क करण्याकरीता हेल्पलाईन क्रमांक म्हणून काळे यांच्या 9028725368 या वैयक्तिक मोबाईल क्रमांका वर थेट संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थी काँग्रेस, युवक व क्रीडा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
काळे यांची भावनिक साद घालणारी पोस्ट :
प्रिय नगरकरांनो, अखेर सिताराम शाळा सारडा विद्यालय परिसर तंबाखूमुक्त करण्यामध्ये यश आले आहे. “तो” गाळा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आला आहे. उशिरा का होईना पण नगर शहर काँग्रेसच्या मागणी, आक्रमक भूमिका व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जागे झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, मनपा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन कार्यालय प्रशासनाचे यासाठी आभार मानतो. मात्र त्यांनी सातत्य ठेवावे. हे ही त्यांना लक्षात आणून देऊ इच्छितो. शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे या विद्यालयाच्या १०० मीटर परिसरात पुन्हा तंबाखू विक्री सुरू होणार नाही याची दक्षता प्रशासने घ्यायची आहे. त्यावरती काँग्रेसचा “वॉच” असणार आहे.
शेवटी या शहरातील भावी पिढी ही व्यसनमुक्त झाली पाहिजे यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत. या सर्व मोहिमेत धाडसाने उतरणाऱ्या माझ्या काँग्रेसच्या तमाम सर्व सहकाऱ्यांचे मी कौतुक करतो. विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खूप मोठे धाडस दाखवले. एक हाडाचा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी एवढे मोठे धाडस करतो याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कुणाच्या पोटावर पाय देणे हा काँग्रेसच्या मोहिमेचा उद्देश नाही. त्या गाळ्यामध्ये गाळा मालकाने स्वतःच पोट भरण्यासाठी शालेय स्टेशनरी किंवा अन्य कोणताही समाजहिताला बाधा न आणणारा व्यवसाय करावा. या मोहिमेत सर्व प्रसारमाध्यमांनी मोठी साथ दिली त्यांचे ही मी जाहीर आभार मानतो.
आता खरी नगर शहरातील सर्व शाळा, महाविद्यांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या काँग्रेसच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. सिताराम शाळा विद्यालयासह न्यू आर्ट्स महाविद्यालय, रेसिडेन्शियल शाळा व महाविद्यालय परिसर देखील तंबाखूमुक्त झाला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक दृष्टिकोनातून मी व माझे सर्व सहकारी पुढील आठवड्यापासून इतर शाळा व महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सातत्यपूर्ण काम करणार आहोत.
या मोहिमे दरम्यान शहरातील अनेक नागरिकांनी, पालकांनी समक्ष भेटून, फोन करून, व्हाट्सअप द्वारे मेसेज पाठवून या अभियाना बद्दल आपल्या सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ह्या नगर शहराच्या तरुण पिढीला व्यसनाधीनते पासून आणि जुगार, सट्टा याच्या विळख्यात अडकण्यापासून रोखण्याच्या कामी मला व माझ्या सहकाऱ्यांना नक्कीच प्रेरणादाई आहेत.
माझे तमाम नगरकरांना भावनिक आवाहन आहे की, आपल्या घरातील लहान मुले, महाविद्यालयात जाणारी आपली तरुण मुले यांना गुटका, तंबाखू, व्यसनाधीनता जुगार, सट्टा यातून वाचविण्यासाठी कुणी शिक्षक, कुणी आई वडील, कुणी आजी – आजोबा, कोणी मोठा भाऊ, मोठी बहीण, कुणी काका – काकू, कुणी मामा-मामी कोणी मावशी – काका, कुणी आत्या – मामा अशा वेगवेगळ्या रुपात का होईना पण आपण पुढे आले पाहिजे. आपणही सर्वांनी आपल्या कुटुंबातील लहान मुले आणि तरुण मुलांना या घाणेरड्या व जीवघेण्या चक्रव्यूहातून वाचविण्यासाठी या अभियानामध्ये सक्रियपणे आपल्या जमेल तशा पद्धतीने सहभागी व्हावे असं मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो.
नगरकरांचा सेवेकरी,
किरण गुलाबराव काळे (एमबीए)
जिल्हाध्यक्ष – अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
———————————————-