पोलीस स्मृती दिन विशेष

21 आक्टोबर पोलीस हुतात्मा दिन विशेष

अहमदनगर दि.21 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी
केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा जवान गस्त घालत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेने देशात दुःखाची लहर पसरली होती. वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलिस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी देशभर मागील वर्षभरात कर्तव्य करत असताना आपले प्राणाची आहुती देऊन शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जिल्हा पोलीस व आयुक्तालयांचे मुख्यालयाचे ठिकाणी शोकसलामी देऊन मानवंदना दिली जाते व सर्व शहिद अधिकारी व अंमलदार यांचे नावाचे वाचन केले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सुची मध्ये सामाविष्ट असलेला देशाची अतंर्गत सुरक्षा, कायद्याची अंमलबजावणी व? कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारा हा महत्त्वाचा घटक. परंतु सध्या पोलीसांचे कामकाज, राजकिय हस्तक्षेप व पोलीस प्रतिमा, या विषयावर खुप वेळा जनमानसात, माध्यमामध्ये चर्चा सुरू असते, पुष्कळ वेळा पोलीस प्रतिमा, ही समाजामध्ये नकारात्मक अशीच दर्शविली जाते. खरोखरच का पोलीस इतके वाईट असतात ? कोणतेही क्षेत्र बघा, त्यामध्ये काही लोक चांगले काम करणारे, काही मध्यम स्वरुपाचे तर काही निश्चितच खराब काम करणारे असतात. इतर विभागात खराब काम करणारे अधिकारी व कर्मचारी असले, त्यांनी काही खराब काम केले तरी त्याबाबत विशेष चर्चा, ना समाजामध्ये, ना माध्यमातून होताना दिसत नाही. इतर विभागातील एखादा उच्चपदस्थ अधिकारी किंवा कर्मचारी समजा दारु पिवुन रस्त्याने झोकांड्या खात चालला किंवा रस्त्यावर लोळत पडला तरीही त्याचेकडे कोणीही लक्ष देत नाही, पण एखादा पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये रस्त्याने वाकडा तिकडा चालला तरी….( कारण तो युनिफॉर्ममध्ये असतो, कोणाचेही त्याकडे तात्काळ लक्ष जाते) जनता लगेच म्हणते, बघा पोलीस कसा दारु पिऊन चालला आहे, त्यांना काय फुकट मिळत असणार! ( या ठिकाणी पोलीसाचे दारु पिण्याचे मुळीच समर्थन करायचे नाही, पोलीस हे शिस्तीचे खाते आहे, आणि अशी वर्तणूक ही पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणारीच आहे आणि अशा पोलीस अधिकारी कर्मचारी यांचेवर तात्काळ कारवाई पण केली जाते.) अशा प्रकारे पोलीस चुकला तर त्याबद्दल माध्यमातून वारंवार तेच तेच दृष्य पुन्हापुन्हा दाखविले जाते. पण इतर विभागाबाबत असे होताना दिसत नाही. पोलीस प्रतिमा मलिन करणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे हिंदी, मराठी चित्रपट (अर्थात काही अपवादात्मक चित्रपटातुन पोलिसांचे चांगले काम पण दाखविले आहे, पण एखादा ..दुसरा).
चित्रपटामधील पोलीस अधिकारी कर्मचारी असे दाखविले जातात ….त्यांचे शर्टचे वरील दोन दोन बटण उघडे, शर्ट इन केलेला नसणे, बेल्ट लावलेला नसणे, कॅप वेडीवाकडी कशीही घालणे, तोंडात पानाचा किवा तंबाखूचा टोबरा व ते खावुन कोठेही पचापच थुंकणे … आणि चित्रपट हे दृक श्राव्य…माध्यम आहे, त्यामध्ये पाहिलेले दृष्य मानवाचे मनोपटलावर कायमचे कोरले जाते. ती माणसांचे मनातील प्रतिमा लवकर पुसली जात नाही. त्यामुळे वास्तवातील पोलीस पण असेच असतात असा समज करुन घेतला जातो. वास्तविक पोलीस विभागा इतके जनसेवेचे काम इतर विभाग अभावानेच करतात. विजेची तार तुटली, शेतात विज पडुन मनुष्य, पशुधन हानी झाली, पुर आला, इमारत पडली, वादळ आले, रस्त्यावर झाड पडले, रेल्वे रुळावरून घसरली, वाहतुक जॅम झाली, रोगराई आली, दारूबंदी, मोटार वाहन संदर्भातील कारवाई, वाळु कारवाई, जंगलतोड, जंगली जनावरांचा मानसावर हल्ला, जंगली जनावर शिकार, दुष्काळ, पाणीपुरवठा वरुन होणारे वाद…अशा कितीतरी गोष्टी आहेत की, ज्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत.पण या सर्व विभागांची कामे, आपल्या विभागाची कामे सांभाळुन पोलीसांनाच करावी लागतात. तरीही पोलीस कधीही जनमानसात खराबच! पोलीसांना प्रसंगी दंगलखोर, दरोडेखोर, नक्षलवादी, माओवादी यांचा सामना करताना कधी कधी आपले प्राणांची आहुती द्यावी लागते. आपण पहातोच की, कोणताही कार्यक्रम, सभा, मेळावा झालेनंतर आभार प्रदर्शन कार्यक्रम असतो…अगदी मुख्य अतिथी पासुन, शिपाई, स्टेज उभे करणारे ,सफाई करणारे यांचेही आभार मानले जातात…पण अजुन तरी आम्ही…सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरिता बंदोबस्त ठेवणारे, वाहतुक, पार्किंग नियोजन करणारे पोलीस बद्दल आभार व्यक्त केल्याचे दिसले नाही… असा हा “Thankless” काम करणारा विभाग, यातील काही थोडेफार खराब काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावरुन संपुर्ण पोलीस विभागाचे मुल्यमापन न करता…त्यांचे चांगले कामाला जास्त प्रसिद्ध दिली, चित्रपटातुन आदर्श पोलीस अधिकारी कर्मचारी दाखवुन पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात चांगली कशी राहील या साठी समाज माध्यमे, दृकश्राव्य माध्यमे, वर्तमानपत्र यांनी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा…व त्याच बरोबर सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनीही पोलीस विभागाची प्रतिमा आपले कर्तृत्वाने उज्ज्वल कशी होईल यासाठी आपणही मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.
जयहिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र पोलीस…..

(हरीष खेडकर)
पोलीस उपअधीक्षक (गृह)
अहमदनगर.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे