विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभासाठी कारागिरांनी नोंदणी करण्याचे आवाहन

व
अहमदनगर दि. 19 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) :- हस्त अवजारे वापरुन हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागिर आणि हस्त कलेच्या कारागिरांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना ओळख प्राप्त करुन देणे तसेच त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर करण्यात आली आहे. कारागिरांनी या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यासाठी नजिकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.आर.मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
असंघटीत क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात-अवजारांनी काम करणाऱ्या आणि योजनेत नमूद केलेल्या 18 कुटूंब आधारित पारंपरिक व्यवसायापैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर या योजनेच्या नोंदणीसाठी पात्र असेल. नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. लाभार्थी नोंदणीच्या तारखेस संबंधित व्यवसायात गुंतलेला असावा आणि स्वयंरोजगार, व्यवसाय विकासासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या तत्सम पत आधारित योजनेंतर्गत मागील 5 वर्षात कर्ज घेतलेले नसावे. या योजनेंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटूंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहतील. शासकी य सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटूंबिय या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. लाभार्थ्याने अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून कारागीर ओळखपत्र देण्यात येईल, त्यानंतर कारागीला योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
नोंदणीसाठी लाभार्थ्याचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक तपशिल, शिधापत्रिका तसेच लाभार्थ्यांना एम.एस.एम.ई. विभागाने विहित केलेल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त कागदपत्रे किंवा माहिती प्रदान करणे आवश्यक राहील.
याबबात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एम.एस.ई.बी. ऑफीस जवळ, स्टेशनरोड, अहमदनगर अथवा दूरध्वनी क्रमांक 0241-2353410 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.