अहमदनगर सह राज्यातील अनेक जिल्हे थंडीने गारठले!
अहमदनगर (प्रतिनिधी) मकरसंक्रांती नंतर साधारणपणे थंडी चा जोर कमी होत असतो.पण यावर्षी थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतच असल्याने भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे.
राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, अहमदनगरसह औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. गुरुवारी सकाळी राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे ८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नगरमध्ये ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. हे सरासरी तापमानाच्या ४ अंशांनी कमी आहे. तसेच जळगाव ८.५, गोंदिया ८.८, औरंगाबाद ८.८, बुलढाणा ८.८, मालेगाव ८.८, नगर ९, वर्धा ९.४, पुणे ८.८, अकोला ९.३, अमरावती १०, यवतमाळ १०, परभणी १०, महाबळेश्वर १०.४, गडचिरोली ११, चंद्रपूर ११.४, नाशिक १०.४, नांदेड ११.८, सोलापूर १४, बारामती १५.९, अलिबाग १६.६, मुंबई १८.५ असे किमान तापमान नोंदविले गेले आहे.