पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार ‘प्रधानमंत्री’ योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद..!
जिल्ह्यातील २६० लाभार्थ्यांना थेट संवाद कार्यक्रमात सहभागी होता येणार

अहमदनगर,२३ मे (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून ‘प्रधानमंत्री’ नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान हे शिमला येथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शन वरून थेट केले जाणार आहे. अहमदनगर येथे ही या योजनेच्या लाभार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण पहाता येणार आहे. यासाठी या योजनेचे २६० लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी ‘प्रधानमंत्री’ या नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी देशपातळीवर संवाद साधणार आहेत. या थेट संवाद कार्यक्रमात देशातील प्रत्येक जिल्ह्याने लाभार्थ्यांसह सहभागी होण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (२३ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी तसेच महसूल, महावितरण, कृषी, बीएसएनएल, जिल्हा परिषद आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण/शहरी), जल जीवन मिशन, अमृत स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक रेशनकार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अॅंड वेलनेस सेंटर, मुद्रा योजना या ‘प्रधानमंत्री’ या नावाने सुरू होणाऱ्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक योजनेचे २० असे २६० लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . त्यापैकी निवडक जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान कोणत्याही क्षणी संवाद साधू शकतात. त्यादृष्टीने अहमदनगर जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, ऑनलाईन थेट संवादात राज्यस्तरावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी २६० लाभार्थ्यांसोबत केंद्र व राज्याचे मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता ही शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.
सामाजिक-आर्थिक-जातनिहाय जनगणनेत मागास ठरलेल्या प्रत्येक वंचित घटकाला या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे. हा मुख्य उद्देश या योजनांचा आहे. यादृष्टीने या योजनेची यशस्विता व उपयोगिता जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
*आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा गाभा समिती व नवसंजीवनी योजनेचा आढावा*
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी यावेळी आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा गाभा समिती व आदिवासीं करता असलेल्या नवसंजीवनी योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक घेतली.
अधिकाऱ्यांनी आदिवासी भागातील दुर्लक्षित भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यादृष्टीने काम केले पाहिजे. बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागातील आश्रमशाळा व वसतिगृहांची शंभर टक्के तपासणी करावी. याच बरोबर अंगणवाडी व आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासणी करावी. आदिवासी पाड्यांमधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी यावेळी दिल्या.