नगर शहर काँग्रेसने केला विजयोत्सव साजरा ; धार्मिक द्वेष, महागाई, बेरोजगारी विरोधात सुज्ञ मतदारांचा कौल – किरण काळे

अहमदनगर दि. १३ मे (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा मतमोजणीचा सकाळच्या सत्रातील कल समोर येताच नगर शहर काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र जमायला सुरुवात केली. मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसतात कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. फुलांची उधळण केली. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यावेळी म्हणाले की, भाजपचे नरेंद्र मोदी नकोत. तर देशाला पुढे घेऊन जाऊ शकणारे राहुल गांधीच हवेत असा देशातील सूर आहे. धार्मिक द्वेष, महागाईचा भडका, बेरोजरीचा उच्चांक या विरोधात कर्नाटकच्या सुज्ञ मतदारांनी कौल दिला आहे. आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करतो. तसा ठराव यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाचा विजय असो, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय असा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक नेते निजाम जहागीरदार, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे आदींनी मनोगत व्यक्त केले.
काळे म्हणाले की, दक्षिणेतून काँग्रेसची सुरू झालेली ही विजयी घोडदौड व्हाया महाराष्ट्र दिल्लीपर्यंत पोहोचेल. दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकताना पाहायला मिळेल. महाराष्ट्रात देखील काँग्रेस कडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेसने ७० वर्षे देशात लोकशाही पद्धतीने सरकार चालवले. जनहिताची कामे केली. मात्र अलीकडील काळात काही लोक हिंदुत्व, प्रभू श्रीराम, बजरंग बली यांचा ठेका आमच्याकडेच आहे अस सांगत आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणजे काही हिंदुत्व नाही. यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे. लोकांनी यांच्या ढोंगी प्रेमाला नाकारल असून नागरि प्रश्नांना या निवडणुकीमध्ये महत्त्व देत मोठी चपराक दिली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मनसुख संचेती, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अजित देवकर, जब्बार शेख, प्रमोद वाळके, जयराम आखाडे, देवराम शिंदे, बाळासाहेब वैरागर, दशरथ शिंदे, इंजि. सुजित क्षेत्रे, शंकर आव्हाड, कल्पक मिसाळ, रतिलाल भंडारी, अजय मिसाळ, उषाताई भगत, शैलाताई लांडे, राणीताई पंडित, गणेश चव्हाण, दीपक काकडे, कौतिक शिंदे, राजेंद्र तरटे, प्रकाश कोळसे, अरुण येमन, ज्ञानदेव कदम, रोहिदास भालेराव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार बांधवांनी देखील केला आनंद व्यक्त :
कर्नाटक विजयाची बातमी समजतात शहरातील कामगार ब बांधव देखील काँग्रेस कार्यालयासमोर एकत्र जमले.आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष काळे यांना पेढा भरवला. यावेळी कामगार प्रतिनिधी जयराम आखाडे म्हणाले की, आज कष्टकरी कामगार बांधवांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काँग्रेसच गोरगरिबांचा आधार होऊ शकते. रोहिदास भालेराव म्हणाले की, काँग्रेस हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. कामगारांना, कष्टकऱ्यांना काँग्रेसचा मोठा आधार वाटतो. महाराष्ट्रात देखील काँग्रेस विजयाची पुनरावृत्ती होईल असा आम्हाला विश्वास आहे.