प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFMC) योजना केंद्र शासन अंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती (डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन) उल्हास भाले यांची अहमदनगर जिल्ह्यासाठी निवड

अहमदनगर दि.28 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
कृषी व अन्नप्रक्रियेत आधारित उद्योग व्यवसाय सुरू होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत विविध योजना सुरू केल्या आहेत. राज्यामध्ये उपरोक्त योजना महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्या मार्फत राबविल्या जातात. यामध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना, उद्योग विस्तारीकरण व सामूहिक सुविधा केंद्र उदा. बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी यांच्यासाठी दहा लाख किंवा बँक मंजुरीच्या पस्तीस टक्के जे कमी असेल ते अनुदानास पात्र आहेत. उमेदवाराचे वय किमान अठरा वर्षे असावे, शिक्षणाची अट नाही.
जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक प्रस्ताव तयार करणे, कर्ज मंजुरीसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य करणे अशी भूमिका आहे. वरील सेवा ही विनामूल्य असून नव्याने कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील युवक, युवती, महिला बचत गट इत्यादी लाभ घेऊ शकतात.
या योजनेसाठी उल्हास भाले संचालक उद्यम इन्फो सोल्युशन यांची ‘ जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून अहमदनगर जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. उल्हास भाले यांनी अठरा वर्षे अहमदनगर जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र येथे कार्य केले असून त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘राष्ट्रीय उद्योग प्रशिक्षक व सल्लागार’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच त्यांनी ग्रँड थॉरटन या जागतिक प्रतीत यश कंपनीत ‘वरिष्ठ सल्लागार’ म्हणून महाराष्ट्र कृषी सक्षमता प्रकल्पात पाच वर्षे सेवा केली आहे.
तरी पात्र उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी या मोफत राष्ट्रीय सेवेचा लाभ घ्यावा. संपर्क मोबाईल क्रमांक 7719003999.