समाजातील बाल कामगार प्रथा बंद होणे आवश्यक: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा

अहमदनगर, 23 जून (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात शेती व्यवसायात बाल कामगारांचे प्रमाण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. ही समस्या आता कमी झाल्याचे चित्र दिसत असून अन्य क्षेत्रात सुध्दा बाल कामगार प्रथा बंद होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. सुधाकर वें. यार्लगड्डा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर सेंटर बार असोसिएशन लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन अहमदनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जागृती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसंगी श्री. यार्लगड्डा आज बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटील,औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. सोनवणे, न्यायाधीश एस. जी. देशपांडे, न्यायाधीश अभिजीत देशमुख,लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिपक चंगेंडे, स्नेहालयचे संचालक गिरीष कुलकर्णी, एल अॅण्ड टी चे संचालक अरविंद पारगावकर, कामगार विभागाचे उपसंचालक,स्वप्नील देशमुख, कामगार विभागाचे उपायुक्त नितीन कवले.सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष के एम देशमुख, अहमदनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप वाडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यार्लगड्डा म्हणाले, लोक आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणाकडे वळाल्यामुळे शेती क्षेत्रातील बाल कामगार समस्या कमी झाली आहे. समाजामध्ये कुटुंबातील पालक हे लहान मुलांना आपली प्रॉपर्टी समजतात. कुटुंबात काही समस्या निर्माण झाल्यास मुले माझ्याकडे राहतील या भावनेतून पालक वागत असतात. परंतु मुल ही प्रॉपर्टी नसून आपली जबाबदारी आहे. मुलांचे पालन पोषण व त्यांना चांगले शिक्षण देऊन ती जबाबदारी केली गेली पाहिजे. 16 ते 18 वयोगटात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. समाजात गरीबी आणि शिक्षणाच्या आभावामुळे बालकामगार प्रथा पहावयास मिळते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिपक चंगेंडे बाल कामगार कायदे या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, उद्याचा भारत जर सक्षम करायचा असेल तर बालकामगार प्रथा पूर्णपणे बंद झाली पाहिजे. बाल कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एल अॅण्ड टी कंपनीचे संचालक अरविंद पारगावकर आपल्या मनोगतात म्हणाले, देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील काळात सर्व लाकांना रोजगार देऊ शकलो नाही तर समाजातील गरीबी वाढत राहील. बाल कामगार प्रतिबंध कायद्यासाठी लोकांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे. ती सामाजिक जाणीव घराघरातून निर्माण झाली तर बाल कामगारांची समस्या दूर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. स्नेहालय संस्थेचे संचालक गिरीष कुलकर्णी यावेळी म्हणाले, बालकामगार प्रथा बंद करण्यासाठी हेल्प लाईन असणे आवश्यक असून समाजामध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.संतोष जोशी ऍड कल्याण पागर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, जिल्हा विधी प्राधिकरणाचे कर्मचारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.