मोहटादेवी संस्थानच्या दोन कर्मचार्यांचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

पाथर्डी (प्रतिनिधी)
श्री क्षेत्र मोहटादेवी संस्थानचे दोन कर्मचारी मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात हंडाळवाडी शिवारातील वृध्देश्वर तालुका सहकारी दुधसंघा जवळ झाला.यामध्ये मोहटा देवस्थान संस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे (दोघेही रा.मोहटादेवी गड) या दोघांचा समावेश आहे. दोन्ही कर्मचारी आपली ड्युटी संपल्यानंतर पाथर्डीकडे येत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दूधडेअरी जवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, एका कर्मचार्याचे मुंडके धडावेगळे झाले. घटनेनंतर दोघांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. या घटनेने मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे. देवस्थान समितीच्या कर्मचार्यांमध्ये मोठी शोककळा परसली आहे. दरम्यान, घटनास्थळावरून चारचाकी वाहन चालक फरार झाला असून यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी गाडीचा नंबर घेतला असून त्याआधारे पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.