कट्टा असता तर इथच छाताडात सहा गोळ्या ठोकल्या असत्या… किरण काळेंना धमकी, कोतवालीत काँग्रेसकडून दोन गुन्हे दाखल अशा भ्याड प्रकारांना भीक घालत नाही, शहराचा विकास करणे आणि दहशतमुक्त करणे हे काँग्रेसचे मिशन थांबणार नाही – काळे

अहमदनगर दि. 13 जानेवारी (प्रतिनिधी ): जिजाऊ जयंती दिनी रात्री मराठा समाजाच्या मंगल कार्यालया जवळ एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता इसम गौरव उर्फ बंटी परदेशी रा. चितळे रोड हा काळे यांच्या जवळ आला आणि म्हणाला की तू अरुणकाका जगताप व संग्रामभैय्या जगताप यांच्या विरोधात तीस मिनिटांचा व्हिडिओ का व्हायरल केला ? त्यांना अरे तुरे करत का बोलला ? आत्ता कट्टा नाही. असता तर इथच छाताडात सहा गोळ्या ठोकल्या असत्या, अशी धमकी दिली. तशी फिर्याद काळे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून १५५ फौजदारी दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंद क्रमांक ३६/२०२४ नुसार भा.द.वी. कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दाखल फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, परत अरुणकाका, संग्रामभैय्या यांच्या विरोधात बोलशील तर तुझा तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या घालून तुझा खून करेल, अशी धमकी दिली. काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा यांनी दुसरी फिर्याद गुन्हा नोंद क्रमांक ३७/२०२४ नुसार भा.द.वी. कलम ५०६ प्रमाणे गौरव उर्फ बंटी परदेशी यांच्या विरोधात नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, परदेशी याने गुंदेचा यांना कोतवाली पोलीस स्टेशनच्या आवारात असताना म्हणाला की, तुझा नेता किरण काळे आत माझ्या विरोधात फिर्याद देऊ राहिला. त्याला सांग फिर्याद दे नाहीतर काही बी कर, त्याने अरुणकाका जगताप, संग्रामभैय्या जगताप विरोधात व्हिडिओ फेसबुकवरून व्हायरल केला. त्या किरण काळेचा मी खून करणार म्हणजे करणारच, अशी धमकी दिल्याचा गुन्हा गुंदेचा यांच्या फिर्यादीवरून कोतवालित नोंदविण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती काळे यांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली.पत्रकार परिषदेस संजय झिंजे, दशरथ शिंदे, विलास उबाळे, सोफियान रंगरेज, अलतमश जरीवाला, चंद्रकांत उजागरे, बाबासाहेब वैरागर, गौरव घोरपडे, विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
यावेळी काळे यांनी राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. परदेशीचे आजी, माजी आमदारां समवेतचे फोटो त्यांनी यावेळी पत्रकारांना दाखवले. काळे म्हणाले, चार जानेवारीला मी फेसबुक वरून एक व्हिडिओ शहरातल्या भयानक स्थितीबद्दलचा अपलोड केला होता. त्यामध्ये अरुण जगताप, संग्राम जगताप यांचे कारनामे याबद्दल भाष्य केले होते. तो व्हिडिओ नगरकरांनी माझ्या फेसबुक वर जाऊन पहावा असे आवाहन काळेंनी केले. एका युट्युब चॅनेल वरून तो व्हायरल झाला होता. मात्र जगतापांनी दहशतीच्या जोरावर तो काढून टाकायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. त्या व्हिडिओचा राग धरून आता त्यांचे पंटर छाताडात गोळ्या घालण्याच्या, खून करण्याची भाषा करू लागले आहेत. उद्या माझ्या जीवाचे तसेच काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जगताप पिता पुत्र जबाबदार राहतील. जिजाऊ जयंती दिनी घडलेला प्रकार दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी तात्काळ ते फुटेज ताब्यात घेऊन जतन करावे. परदेशी हा प्रचंड दारू प्यायला होता. त्याची आम्ही त्याच ठिकाणी दारू पिल्या बाबतची चाचणी करण्याची मागणी केलेली होती. मात्र त्याची चाचणी आम्ही असे पर्यंत करण्यात आली नव्हती.
काळे पुढे म्हणाले, कोतवाली पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या दालनामध्ये फिर्याद नोंदवून घेण्यापूर्वी मला पाचारण केले. माझ्या फिर्यदीचा मजकूर हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दालनात वाचून दाखविला. त्याला आम्ही आक्षेप घेतला. अशाप्रकारे ज्याच्या विरोधात फिर्याद आहे त्याला ती नोंदवण्यापूर्वीच त्यातील मजकूर सांगून गोपनीयतेचा भंग करणे हे योग्य नाही. स्वतः पोलीस निरीक्षकांसमोर परदेशी याने सांगितले की मला काळे यांच्या विरोधात खोटी फिर्याद द्यायची आहे, ती घ्या. खोट्या फिर्यादी दाखल करण्याचा अड्डा कोतवाली पोलीस स्टेशन झाली आहे काय ? पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकां समोरच अशा गोष्टी केल्या जात असतील आणि खोट्या फिर्यादी सुद्धा नोंदवून घेतल्या जात असतील तर पोलीस स्टेशन हे पोलीस चालवतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड चालवतात ? असा संतप्त सवाल यावेळी काळेंनी उपस्थित केले.
काँग्रेसची लढाई या शहरा मधील राक्षसी, अपप्रवृत्तीच्या विरोधात सुरू आहे. नगर शहराचा विकास करण्याची गरज आहे. शहरातील तरुण पिढी, उद्योग जगत, व्यापार, बाजारपेठ सर्वत्र अनंत अडचणी आहेत. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी, रोजगार यासारखे मूलभूत प्रश्न देखील त्यांना त्यांचे मनपा, राज्यात तसेच केंद्रात सरकार असून देखील सोडविता आलेले नाहीत. रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबद्दल काँग्रेस सातत्याने आवाज उठवत असून नगर शहराचा सर्वांगीण विकास आणि शहराला दहशतमुक्त करणे हे काँग्रेसचे मिशन आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहराला पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिक या लगतच्या शहरांच्या धर्तीवर विकसित करणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. आजी, माजी आमदारांना तो मान्य नाही. त्यांना केवळ दहशत माजवायची आहे. शहरात जे गँगचा धुडगूस सुरू आहे. माझी हत्या झाली तरी चालेल. पण शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांनी दाखवलेल्या मार्गावर माझा आणि काँग्रेसचा या शहरातील लढा निर्भीडपणे अखंडरित्या सुरू राहील. हा शहर विकासाचा यज्ञ आहे, असे काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढील आठवड्यात मोठा भांडाफोड करणार :
दरम्यान, काळे यांनी आजी-माजी आमदार पिता-पुत्रांच्या शहराला मागे खेचण्याच्या एका कारनाम्याचा जाहीर भांडाफोड करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्याचा तपशील त्यांनी सांगितला नाही. त्यामुळे नेमका कोणत्या विषयाचा ते भांडाफोड करणार आहेत याबद्दल नगरकरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
त्यांची नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही :
आजी-माजी आमदार पिता-पुत्र यांचे नाव घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही. त्यांची ती पात्रता, लायकी सुद्धा नाही. मात्र दुर्दैवाने यांनी शहराला गिळंकृत करण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे नाईलाजास्त शहर विकासासाठी आड येणाऱ्या, दहशत करणाऱ्यांच्या विरोधात सातत्याने काँग्रेसला नाव घेऊन आवाज उठवावा लागतो. सातत्याने आमच्यावर खोटे गुन्हे दररोज दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र याला मी आणि काँग्रेस भीक घालत नाही, असे काळे म्हणाले.