अन्यथा सावेडी हत्याकांड घडलेच नसते, व्यापाऱ्यांवर दहशत केली गेली – किरण काळे हत्या ताबा प्रकरणावरूनच, त्या बड्या धेंडाच्या चौकशीची मागणी

अहमदनगर दि.२१ जुलै (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता अंकुश चत्तरवर ७४ विविध कलमांसह १६ गुन्हे दाखल असून १६ वर्षांची गुन्हेगारीची मोठी पार्श्वभूमी होती. यात ४ हाफ मर्डर, आर्म ॲक्ट, शासकीय कामात अडथळा, दरोडे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. पोलीसांनी त्याच्या तडीपरीचा प्रस्ताव पाठवला होता. माञ प्रांताधिकार्यांकडे शहरातल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने दबाव आणत तो मंजूर होऊ दिला नव्हता. भाजपचा या हत्याकांडातील मुख्य आरोपीवर देखील गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे असून देखील तडीपारीची कारवाई नव्हती. दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. या दोन्ही टोळ्या शहरातील “जे” गॅंग अंतर्गत काम करतात. जर राजकीय हस्तक्षेप नसता, दोन्हींवर तडीपारी झाली असती तर हे हत्याकांड घडलेच नसते. राजकीय हस्तक्षेप या हत्याकांडाला जबाबदार असल्याचा, खळबळजनक दावा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी संजय झिंजे, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, रतिलाल भंडारी, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, विकास भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. काळेंनी शहरातील गुन्हेगारी कृत्यांचा “जे” गॅंगशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केल्यामुळे “जे” म्हणजे काय याची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काळे यांनी यापूर्वी काँग्रेसच्या वतीने शहर विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने द्यावे अशी जाहीर मागणी केली होती. त्या मागणीचा पुनरुच्चार यावेळी काळेंनी पुन्हा केला. आम्हाला शहरात गुन्हेगारी नव्हे तर विकास, रोजगार, व्यापार, उद्योग आणि शांतता पाहिजे असे ते म्हणाले.
हत्याकांड लहान मुलांच्या भांडणावरून झाले नसून औरंगाबाद रोडवरील एका प्लॉटच्या ताबा प्रकरणावरून घडलं आहे. त्या प्लॉटचा मालक हा पेट्रोलियम धंद्यातला आहे. त्याची कसून चौकशी केली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. पोलिसांना आम्ही याबाबत माहिती दिली असून त्याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. मयत चत्तर, मुख्य आरोपी, प्लॉटचा मालक आणि या तिघांच्या संपर्कामध्ये असणारे राजकीय नेते आणि त्यांचे हस्तक या सगळ्यांचे सीडीआर, एसडीआर रेकॉर्ड काढून या गुन्ह्याची सखोल तपास करत खरी उकल झाली पाहिजे, अशी कॉग्रेसची मागणी असल्याचे काळे म्हणाले.
भाजपाच्या आरोपीला सत्तेच्या माध्यमातून सो-धातील ग्रामीण भागातील नेत्याने वाचवण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. दुसऱ्या बाजूला याच सो-धा पक्षातील दुसरा नेता मयताच्या नातेवाईकांना उपमुख्यमंत्र्यांकडे नेत नातेवाईकांची, नगरकरांची दिशाभूल करत आहे. वास्तविक पाहता सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हा कैद झाला आहे. त्यामुळे सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी सुद्धा दिशाभूल करणारी आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगारांना शिक्षा अटळ आहे. त्यांना अटक झाली असून त्यांचा जामीन होणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही. असे असतानाही कस्टडीत असणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी म्हणजे नातेवाईकांच्या भावनांशी खेळले जात असल्याचा आरोप काळेंनी केला आहे. हत्याकांड गॅंगवॉर मधून झाले असले तर देखील खुनाचे समर्थन काँग्रेस कदापी करणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे चत्तर कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे.
हत्याकांड प्रकरणी विधानसभेत शहर लोकप्रतिनिधींनी अजूनही ब्र काढलेला नाही. मात्र मी स्वतः याबाबत काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित करून गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. चत्तरच्या तडीपारचा प्रस्ताव ज्या प्रांताधिकार्यांनी तो रोखून धरला. पोलिसांनी देखील त्रुटींची पूर्तता केली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची महसूल मंत्री तथा पालकमंत्र्यांकडे, गृहमंत्र्यांकडे मागणी आहे . चत्तर ज्या पक्षात होता त्या पक्षाच्या नेत्यांना तो शहरात ताबे मारण्यासाठी हवा होता. म्हणूनच त्याची तडीपारी होऊ दिली जात नव्हती. चत्तरचा राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगारी कृत्यांकरिता वापर केला गेला. मात्र यामध्ये चत्तरचे कुटुंबीय उघडे पडले आहेत. शहरातील “जे” गॅंग अनेक तरुण मुलांना आपल्या राजकीय आकर्षणातून जाळ्यात ओढत त्यांना गुन्हेगारी मार्गाला लावते. चत्तरचा शेवट अत्यंत वाईट झाला. या उदाहरणातून “जे” गॅंग मध्ये काम करणाऱ्या इतर युवक, कार्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे. वेळीच त्यांनी या गॅंग पासून दूर झाले पाहिजे असे आवाहन करत काळे म्हणाले की अन्यथा भविष्यात शहरात अनेकांचा चत्तर झाला तर ते धक्कादायक वाटू नये.
दरम्यान, काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपाधीक्षक आणि कातकडेंची भेट घेत एसपींच्या नावे निवेदन दिले आहे. अनेक गंभीर तक्रारी काँग्रेसने केल्या. अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. सोमवारी दुपारनंतर पाईपलाईन रोडवर प्रभाग १ व २ मधील व्यापारी, दुकानदार, हात गाडीवाले, हातावर पोट भरणारे कष्टकरी, भाजीवाले, फळविक्रेते, वैद्यकीय सेवा पुरवणारे यांच्यावर दहशत करत दुकाने बंद करायला लावण्यात आली. दगडफेक करू म्हणत शिवीगाळ करून दहशत माजवण्यात आली. ही घटना शहर लोकप्रतिनिधी, पोलिसांच्या समोर घडली. पोलिसांनी माञ बघ्याची भूमिका घेतली. सदर हत्याकांडाशी नागरिकांचा संबंध नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली ? असा सवाल काळे यांनी केला असून बघ्याच्या भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचा काँग्रेसने निषेध केला आहे. सध्या एसपी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. हे खरे तर कॉन्स्टेबल, कनिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. ही एसपींची नाचक्की आहे. मुख्य आरोपी भाजप नगरसेवकाची आठ दिवसांच्या आत हाकालपट्टी करण्याचा अल्टिमेटम शहर काँग्रेसने दिला असून न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे नव्याने सावेडी व केडगावसाठी दोन स्वतंत्र पोलीस स्टेशनची काँग्रेसची शासनाकडे जुनी मागणी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी पडणारी असून यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. तसेच पोलीस हेडकॉटरमधील कर्मचाऱ्यांच्या घरांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आहे. याचा रिडेव्हलपमेंट प्लॅन तात्काळ मंजूर होऊन अद्यावत बिल्डिंग उभ्या राहिल्या पाहिजेत. याबाबत पुन्हा एकदा गृहमंत्र्यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी सांगितले.