‘अर्शदनामा’ भिंती उद्ध्वस्त करेल; नवे सेतू बांधेल: संजय आवटे

अर्शद शेख ‘आर्किटेक्ट’ आहेत. व्यवसायाने ते आर्किटेक्ट असले तरी ‘सोशल आर्किटेक्चर’ अशा अंगाने त्यांच्या वास्तुशैलीकडे आणि विचारांच्या मांडणीकडेही पाहायला हवे. ‘सोशल इंजिनिअरिंग’प्रमाणे ‘सोशल आर्किटेक्चर’ हा शब्द तसा वापरला जात नाही. मात्र, अर्शद यांचे लेखन वाचत असताना सातत्याने हाच शब्द मनात येत जातो.
पाडणारे हात वाढत चाललेले असताना, बांधणारे हात या लेखनात दिसतात. पूल बांधणारे हात दिसतात. सगळीकडे अंधारून आलेले असताना आश्वासक काही गवसावे, असे हे लेखन आहे.
अर्शद सातत्याने लिहीत असतात. वर्तमानपत्रांच्या चोकटीत शब्दांची मर्यादा असते. पण, त्यामुळे नेमकेपणाही असतो. वर्तमानपत्रांच्या या मर्यादेत लिहिताना अर्शद जी मांडणी करतात, ती समकालीन संदर्भांचा उहापोह करतेच. पण, त्याचवेळी भविष्याचा वेधही घेते.
अर्शद यांच्या लेखनाला असणारे अधिष्ठान व्यापक आहे. त्यामागे एक भूमिका आहे. खरे म्हणजे, ते काही व्यावसायिक लेखक नव्हेत. मात्र, समकालीन संदर्भांवर मौन बाळगणे त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते बोलतात. भूमिका घेतात. ठोस मांडणी करतात. सामाजिक हितासाठी, व्यापक ध्येयासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आहे, हे जाणवत राहाते.
व्यवस्थेला प्रश्न विचारताना, ते वास्तवाची चिरफाड करतात. लोकांपासून लपवून ठेवलेले वास्तव उघड करतात. या ‘पोस्ट ट्रूथ’ कालखंडात सत्यच संपलेले असताना आणि माध्यमांनी ‘ॲनस्थेशिया’ देणे सुरू केलेले असताना, हे लेखन जागे करते. वास्तवाचे भान देते. सामान्य माणसाला सजग करते.
हेतूतः संदर्भ बदलून विपर्यस्त मांडणी होत असलेल्या या कालखंडात ‘आयडिया ऑफ इंडिया’ची समर्पक मांडणी अर्शद करतात.
सध्या काळ कठीण आहे. म्हणजे, परवाची घटना. फ्लाइटमध्ये बसल्यावर ‘आझादी का अमृतमहोत्सव’ची सरकारी जाहिरात सुरू झाली. मंगल पांडे हा पहिला स्वातंत्र्यसैनिक असल्याची माहिती आणि तात्या टोपे वगैरेंची महती सुरू झाली. त्याविषयी आक्षेप नाही. पण, स्वातंत्र्याची चळवळ अशी एकदम मागे घेऊन जायची आणि १८८५ ते १९४७ हा मुख्य स्वातंत्र्यसंग्राम नाकारायचा, अशी खेळी यामागे असते.
‘जेएनयू’च्या पहिल्या महिला कुलगुरू सन्माननीय डॉ. शांतीश्री पंडित यांनी या संदर्भात केलेली मांडणी हे अशा विपर्यस्त मांडणीचे ठळक उदाहरण मानायला हवे.
‘आयडिया ऑफ इंडिया’ ही कशी वेदकालीन आहे आणि विष्णुपुराणात कसा याचा उल्लेख आहे, अशी वाटेल तशी ही ‘मांडणी’ आहे.
स्वातंत्र्यचळवळ नाकारायची. स्वातंत्र्यचळवळीतून उदयाला आलेली मूल्ये नाकारायची. गांधी-नेहरू नि आंबेडकर, मौलाना आझाद आणि पटेल नाकारायचे. संविधानच नाकारायचे. आणि, समता, विविधता, संवाद, लोकशाही हे आमच्याकडे पुरातन काळापासून कसे होते, अशी विपर्यस्त परंपरा सांगायची. शिवाय संस्कृतीसह इतिहास सांगतानाही तो ‘सिलेक्टिव्ह’ सांगायचा. यांच्या भारताचा शोध ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नसतो, तर तो एकरेषीय असतो.
भारताचा बहुसांस्कृतिक चेहरा नाकारायचा, पण विवेकी विविधता कशी ‘आमच्या’ संस्कृतीत आहेच, अशी चलाख मांडणी करायची. विविधतेतील एकता सांगताना एकसाची, एकजिनसी, एकसुरी संस्कृती सांगायची. समतेऐवजी समरसता सांगायची!
यापैकी एकालाही, स्वातंत्र्याच्या आंदोलनातून भारताचे मूल्यभान देणारे गांधी दिसत नाहीत. आधुनिक भारताची एकेक वीट रचणारे नेहरू समजत नाहीत. आणि, ‘मनुस्मृती’ जाळून संविधान निर्माण करणा-या- बुद्धाची वाट चोखाळणा-या बाबासाहेबांचा संघर्ष दिसत नाही. संविधानच नाकारणा-यांना हे कसे दिसेल? भारताचा ‘राष्ट्रवाद’ त्यांना कसा कळेल?
त्यामुळे हे एकतर, गेल्या आठ वर्षांबद्दल बोलतात. किंवा, थेट त्रेतायुगात जातात. तिथून पुष्पक विमानाने १८५७ च्या उठावापर्यंत येऊन लॅंड होतात. त्यानंतरच्या काळाविषयी हे बोलत नाहीत. आणि, नेमका हाच तो काळ आहे, ज्याने ‘आयडिया ऑफ इंडिया’ला जन्म दिला. हा तो भारत आहे, जो यांना नाकारायचा आहे. तो भारत अर्शद यांच्या लेखनातून पुढे येतो. राष्ट्रवादाची मांडणी करताना, अत्यंत शास्त्रशुद्धपणे ते मांडत जातात. हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल मांडणी करताना तर ते समाजमनाचा अचूक वेध घेत, उत्तराची वाट प्रशस्त करतात.
अर्थकारणाच्या संदर्भात सरकारचे अपयश सांगताना, त्यांची लेखणी टोकदार होतेच. पण, त्याचवेळी अत्यंत अभ्यासूपणे ते एकेक मुद्दा उलगडत जातात. आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलही तेवढ्याच अभ्यासूपणे मांडणी करतात. सप्रमाण आणि साधार मांडणी असल्याने ती विवेकी आणि वस्तुनिष्ठ असणे स्वाभाविकच. व्यवस्थेला असे प्रश्न विचारणे समकालीन भवतालात सोपे नाही. मात्र, असे प्रश्न विचारण्याचे साहस अर्शद करू शकतात. याचे कारण, ते एक कृतिशील विचारवंत आहेत. व्यवस्था परिवर्तनासाठी काम करणारा कार्यकर्ता, शाश्वत आणि पर्यावरणपूरक वास्तूशैलीसाठी प्रयोग करणारा आर्किटेक्ट, अहमदगरमध्ये शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारा सजग नागरिक अशी त्यांची अनेकविध रूपे आहेत. त्यातून त्यांचे लेखन आकार घेत असल्याने, त्यात असे वैविध्य स्वाभाविक आहे.
आज सत्य लपवले जात असताना अणि सगळेजण व्हाट्सॲप विद्यापीठाचे विद्यार्थी होत चाललेले असताना, या लेखनाचे मोल आणखी वाढते.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आम्ही दोन संकल्पना शिकवतोः
१. Misinformation: यात चुकीची माहिती दिली जाते
२. Disinformation: इथे जाणीवपूर्वक, ठरवून, नियोजनबद्ध पद्धतीने हवी तशी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते.
‘Disinformation’ चा उद्गाता आहे स्टॅलिन. हिटलरच्या डॉ. गोबेल्सप्रमाणं, हेतूतः चुकीची माहिती पसरवणं स्टॅलिननं त्यापूर्वीच रशियात पद्धतशीरपणे सुरू केलं होतं. त्यासाठी खास ‘Special Disinformation Office’ असा सेलच १९२३ मध्ये त्याने सुरू केला.
हिटलर असो वा मुसोलिनी किंवा स्टॅलिन वा मुगाबे, सगळ्या हुकुमशहांना अशी माध्यमे हवी असतात. आज या संदर्भात वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. अशावेळी या लेखनाचे मोल लक्षात येते.
अर्शद यांचे लेखन ओघवते आहे. शैलीमुळे ते वाचनीय होते. अभ्यासकाची बैठक आहे, मात्र सामान्य माणसापर्यंत हे सारे पोहोचावे, अशी कळकळही आहे. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, अशी त्यांची प्रार्थना आहे.
त्यासाठीच त्यांची प्रत्येक कृती आहे. या पुस्तकातून मिळणारी दिशा त्यामुळे महत्त्वाची.
त्यांच्या ‘अर्शदनामा’चे म्हणूनच मी मनापासून स्वागत करतो. अवघ्या मराठी मुलुखात जागर करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.