काँग्रेसने आयुक्तांची गाडी आडविण्यापूर्वीच डीएसपी चौकातील सिग्नल सुरू ; काँग्रेसच्या दणक्यानंतर मनपा, पोलीस प्रशासन आले ॲक्शन मोडमध्ये

अहमदनगर दि. २९ जून (प्रतिनिधी) : डीएसपी चौकातील अनेक दिवसांपासून बंद असणारा सिग्नल तात्काळ सुरू करा. अन्यथा आयुक्तांचीच गाडी याच चौकात अडवू, असा इशारा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांना दिला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे भेट घेत त्यांनाही सिग्नल सुरू करण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन स्तरावर समन्वय साधण्याची मागणी केली होती. गाडी अडविण्याच्या काँग्रेसच्या इशाराचा मात्र आयुक्तांनी चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चोवीस तासातच सिग्नल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि सिग्नल कार्यान्वित करण्यात आला आहे. काँग्रेसला यश आले आहे.
काँग्रेसच्या दणक्यानंतर मनपा व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, या चौकात मोठी वर्दळ असते. मनपा, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय यासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालयं या रोडवर आहेत. शहरासह शहरा बहेरीलही मोठी वाहतूक या रोडने होत असते. नुसत निवेदन देऊन मनपातील टाचणी सुद्धा हलत नाही, असा आमचा अनुभव आहे. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही अशी जुनी म्हण आहे. त्यामुळेच आयुक्तांचीच गाडी आडविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते या चौकात सज्ज होते. ट्राफिक जाम मध्ये नागरिकांची कशी गैरसोय होते, हे आयुक्तांची गाडी अडवून त्यांना नागरिकांना होणारा त्रास लक्षात आणून देणे हा यामागील हेतू होता.
मात्र त्यापूर्वीच आयुक्तांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा चांगला धसका घेतला. काँग्रेसच्या जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी देखील आयुक्तांशी चर्चा करत सिग्नल चालू करण्याबाबत सूचना केली होती. नगर शहरात मनपाला कोणाचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे सिग्नल सारखी छोटी गोष्ट सुद्धा दुरुस्त व्हायला अनेक दिवस नागरिकांना वाट पाहायला लागली. पाऊस शहरात सुरू झाला आहे. अजूनही ओढ्या नाल्यांची सफाई नाही. रस्ते निकृष्ट कामांमुळे वाहून चालले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यातच होणाऱ्या चिखल्यामुळे लोक घसरून पडत आहेत. जखमी होत आहेत. नळांना दूषित पाणी येत आहे. या सगळ्याला मनपा प्रशासन, मनपाचे नेतृत्व करणारे लोक आणि शहराचे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.