माजी मंत्री थोरात, शहर काँग्रेस केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजक, कामगारांच्या पाठीशी – किरण काळे ; औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावीत

अहमदनगर दि. १४ जून (प्रतिनिधी)
केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासह मूलभूत सुविधांची सर्व प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावित. त्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेत केली आहे. या ठिकाणी काम करणारे उद्योजक, कामगार हे शहराच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. सुरुवातीच्या काळापासूनच काँग्रेसने या वसाहतीसाठी माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक भूमिका घेतली असून शहर काँग्रेस उद्योजक, कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन काळे यांनी केले आहे.
काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची देखील भेट घेतली असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष सतीश बोरा, तज्ञ संचालक अरविंद गुंदेचा, उद्योजक मेहुल भंडारी, माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, केडगाव काँग्रेस विभागप्रमुख विलास उबाळे, सचिव रतिलाल भंडारी, बाबासाहेब वैरागळ, दीपक काकडे आदींसह उद्योजक उपस्थित होते.
काळे म्हणाले की, नगर एमआयडीसीमधील मोठ, मोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, लघुउद्योजकांची तसेच केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट मधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतलेला आहे. तत्कालीन महसूल मंत्री आ. थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मनपाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरातांनी आयुक्तांना विकास कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.
तसेच तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात देखील शहरातील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली होती. मात्र अचानक सरकारमध्ये खांदेपालट झाला. त्यानंतर ही कामे प्रलंबित राहिली. शहर काँग्रेसची भूमिका ही केडगावसह शहरातील सर्वच उद्योजक, कामगार, व्यापारी बांधवांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे. यावर हजारो कामगार अवलंबून आहेत. त्यामुळे विकास कामे करताना संकुचित मनोवृत्तीतून पाहणे योग्य नाही. काँग्रेसचे व्हिजन हे शहराला उद्योग नगरी करत विकसित शहर उभे करण्याचे आहे.
काळे पुढे म्हणाले की, १४० पेक्षा जास्त कारखाने केडगावमध्ये सध्या सुरू आहेत. ३००० पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. महानगरपालिकेला उद्योजक दरवर्षी सुमारे पाच ते सहा कोटींचा कर देतात. मागील दहा वर्षांमध्ये सरासरी ६० कोटी पेक्षा अधिक कर उद्योजकांनी दिलेला असताना देखील महापालिकेने जबाबदारी झटकण्याचे कारण नाही. वसाहतीतील ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईटची कामे देखील मनपाने मार्गी लावली पाहिजेत. काँग्रेसच्या सकारात्मक भूमिकेचे इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष संतोष बोरा, अरविंद गुंदेचा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वागत केले.
*उद्योजकांच्या विरोधातील “ती” भूमिका काँग्रेसची नाही :*
इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योजक, कामगारांच्या वतीने मनपाकडून मुलभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्याच्या मागणीला काँग्रेसचे पदाधिकारी दीप चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे विरोध केला होता. त्यावर उद्योजकांनी चव्हाण यांच्या विरोधात पत्रक काढत खडे बोल सुनावले होते. याबाबत शहर जिल्हा काँग्रेसने जाहीर खुलासा केला आहे की, चव्हाणांची ती भूमिका वैयक्तिक पातळीवरील आहे. त्याचा काँग्रेस पक्षाशी दुरान्वये देखिल काही एक संबंध नाही. आ. बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून शहरातील उद्योजक, कामगार, व्यापारी यांचे प्रश्न मार्गी लावण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मनपाला कोट्यावधी रुपयांचा कर भरणाऱ्या उद्योजकांना सोयी सुविधा देण्यापासून मनपा पळ काढू शकत नाही, असे संजय झिंजे, अनिस चुडीवाला, रतीलाल भंडारी यांनी म्हटले आहे.