समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘समता रॅली’ चे आयोजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘समता रॅली’ चे आयोजन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अहमदनगर,दि.१३ एप्रिल (प्रतिनिधी) समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी ‘समता रॅली’ व ‘व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.
सकाळी ८.०० वाजता जिल्हा परिषद प्रांगणातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. साडेआठ वाजता जिल्हा परिषद ते समाजकार्य महाविद्यालय दरम्यान ‘समता रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीत शासकीय वसतिगृहातील मुले व मुली, समाजकार्य महाविद्यालय, आय.एम.एस.महाविद्यालय व अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी व शासकीय अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहेत.
सकाळी अकरा वाजता समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचे “महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुजनांसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान होणार आहे.असेही श्री.देवढे यांनी सांगितले.