शासकीय कामकाजात गतिमानतेसाठी अहमदनगर जिल्ह्यात ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ई-ऑफिस प्रणालीसाठी 4 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी

अहमदनगर दि. 5 एप्रिल (प्रतिनिधी)- आजच्या संगणकाच्या युगात कामे अधिक वेगवान व जलदगतीने होण्यासाठी संगणकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा
अधिकाधिक वापर करण्यावर सर्वत्र भर दिसत आहे. शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींची कामे जलदगतीने होऊन कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कामकाजामध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे.
*पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ई-ऑफिस प्रणालीसाठी 4 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी*
अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ई-ॲाफिस प्रणाली कार्यान्वित करून त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सात प्रांत कार्यालये तसेच १४ तहसील कार्यालयातील उपलब्ध संगणकीय साहित्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले. ही प्रणाली अत्यंत वेगवान पद्धतीने राबविण्यासाठी सर्व कार्यालयास साधनसामग्रीची आवश्यकता भासणार होती. ई- ऑफिस प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्वसामान्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, युपीएस यासह आवशक साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 4 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून नुकतेच शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शिर्डी प्रांत कार्यालयासाठी संगणक,प्रिंटर व लॅपटाॅपचे वितरण करण्यात आले आहे.
*अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण*
ई- ऑफिस प्रणाली अत्यंत प्रभावीपणे, जलदगतीने व बिनचूक राबविण्यात येऊन सर्व सामान्यांची कामे सुलभतेने होण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या पुढाकारातून सर्व शासकीय कार्यालयातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही प्रणाली कशा पद्धतीने राबविण्यात येते. ई- ऑफिस प्रणालीच्या तांत्रिक बाजू, त्यासाठी आवशक असणाऱ्या बाबी याबाबत संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.शासनाच्या सूचनांनुसार येणाऱ्या काळात ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्यांना जलदगतीने सेवा पुरवण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत.