भगवान महावीरांचे विचार देश, समाजाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील भगवान महावीरांना अभिवादन

शिर्डी, दि. ४ एप्रिल (प्रतिनिधी) – समस्त मानव जातीला सत्य आणि अहिंसेचा मंत्र देणाऱ्या भगवान महावीरांचे विचारच देशाच्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त ठरतील. असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
भगवान महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त लोणी येथील जैन स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी भगवान महावीर यांना अभिवादन केले.
याप्रसंगी महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, आपल्या देशाची परंपराच ही विचारांवर आधारित आहे. अध्यात्माचा पाया भक्कम असल्यामुळेच समाजाची जडणघडण त्या विचारांच्या आधारेच झाली. सर्व धर्मांनी आपले तत्वज्ञान मांडताना सत्य आणि अहींसेचा विचार सर्वांसमोर ठेवला. त्या विचारानेच हा देश यशस्वी वाटचाल करु शकला. अनेक वर्षांनंतरही भगवान महावीरांचा विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी वाटत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जगातील इतर देशांची परिस्थिती पाहिली तर अशांततेचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्व संकटावरही मात करुन पुन्हा उभारी घेतली आहे. त्यामुळेच भारत देशाची ओळख जगामध्ये वेगळ्या पध्दतीने होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण आणि पाठबळ या सर्व प्रयत्नांमागे असल्याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी जैन श्रावक संघाच्या वतीने महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. जैन श्रावक संघाच्या सर्व पदाधिका-यांसह सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, ट्रक्स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.