नाशिक पदवीधर निवडणूक : माविआ उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उद्या जिल्हा दौऱ्यावर!

अहमदनगर दि. २६ जानेवारी (प्रतिनिधी) : नाशिक पदवीधर निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. तांबे पिता – पुत्रांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. जागांच्या आदलाबदली मध्ये आता ही जागा शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वतीने लढत आहे. माविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले अहमदनगर शहरात येत असून यावेळी ते शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
आ. पटोले सकाळी साडेदहा वाजता नगर शहरात दाखल होणार आहेत. सक्कर चौकातील हॉटेल यश पॅलेस येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदारांशी यावेळी ते संवाद साधणार आहेत. यावेळी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नेते यांची उपस्थिती असणार आहे. बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.