राजकिय

“त्यांनी” आधी काँग्रेसला मामा बनवलं, आता पदवीधरांना बनवत आहेत – किरण काळे ; काँग्रेस आक्रमक, मविआच्या विजयासाठी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते लागले कामाला

अहमदनगर दि. २४ जानेवारी (प्रतिनिधी) : नगर शहराच्या जनतेने २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार असणाऱ्या सत्यजित तांबेंना २९ हजारांच भरघोस मतदान दिलं. पराभवनंतर ते त्यांच्यासाठी विरोधकांना अंगावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना शहरातून वाऱ्यावर सोडून गेलेच पण २९ हजार मतदारांना देखील त्यांनी वाऱ्यावर सोडलं. नगरकरांकडे त्यांनी परत कधी ढुंकूनही पाहिलं नाही. काँग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म यांनी गद्दारी करत खिशात घातला. त्यांनी आधी काँग्रेसला मामा बनवलं. आता मतांसाठी ते सुशिक्षित असणाऱ्या पदवीधरांना मामा बनवत असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

महविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज सकाळी नाशिकमध्ये या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आणि मेळावा पार पडला. तर नगर शहरामध्ये पदवीधर मतदारांची आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये काळेंनी काँग्रेसच्या वतीने तांबेंच्या गद्दारीवर टीका करत हल्लाबोल केला. यावेळी नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले होते. पदवीधरांशी झालेल्या संवादानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराची रणनीती निश्चित करण्यात आली.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदे, सरचिटणीस स्वप्निल पाठक, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी तांबे यांच्या प्रचारात जिल्हा काँग्रेस उतरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांना प्रांताध्यक्ष पटोले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलावर आहे. तांबे पिता पुत्रांचे याआधीच राष्ट्रीय काँग्रेसने निलंबन केले आहे. त्यातच आता किरण काळे यांच्यावर नगर शहरासह जिल्ह्यातून देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना आक्रमक प्रचारासाठी कार्यान्वयीत करण्याची पक्षाने जबाबदारी दिली आहे. जिल्हयातील कार्यकर्ते हे आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. थोरात हे कधी काँग्रेस विचारांशी प्रतारणा करू शकत नाहीत. मात्र काँग्रेसने ज्यांना वर्षानुवर्ष सत्ता दिली त्या तांबेनी मात्र गद्दारी केल्याबद्दल यावेळी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

काळे म्हणाले की, यांना पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला होता. डॉ.तांबे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यांना लढायचे नव्हते तर ते सत्यजित यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल करू शकत होते. मात्र यांनी गद्दारी केली. राज्यात सध्या गद्दारांचे सरकार आहे. त्यांना भाजपमध्ये जायचे आहे. ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असे म्हणत यांनी प्रचाराला सुरुवात केली. यांना पाच ही जिल्ह्यांमधून मतदारांनी तोंडावर सांगितले की तुम्ही भाजपचा पाठिंबा घेणार असाल तर आम्हाला गृहीत धरू नका म्हणून यांनी माझ्या श्वासात, रक्तात काँग्रेस असल्याचे म्हणायला सुरुवात केली. भाजप नेत्यांनी काहीही सांगू मात्र त्या विचारांच्या मतदारांवर, कार्यकर्त्यांवर लादलेल्या या आयात उमेदवारामुळे त्यांनीही आता तांबेंच्या विरोधात भूमिका घेतल्याचे काळे यावेळी म्हणाले.

त्यांच्या श्वासात, रक्तात फक्त सत्ता आहे. यांना पदवीधरांच्या प्रश्नांचे काही देणे घेणे नाही. अनेक पदवीधरांनी आम्हाला सांगितले की आम्हाला वाढदिवसाला शुभेच्छांचा फोन उमेदवारांच्या वडिलांकडून नेहमी येतो. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमी गोड-गोड बोलले जाते. मात्र आजपर्यंत आमचा कोणताही प्रश्न यांनी मार्गी लावला नाही. आम्हाला नुसत्या गोड बोलणाऱ्यांची गरज नसून पदवीधरांसाठी तळमळीने काम करणाऱ्या आमदाराची गरज आहे. शुभांगी पाटील या सर्वसामान्य घरातल्या आहेत. त्यांना घराणेशाहीचा वारसा नाही. त्यांचा विजय निश्चित असून, नगर शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस त्यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात कामाला लागली असून कोणत्याही परिस्थितीत सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांना मतदार माफ करणार नाहीत, असे यावेळी काळे म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे