कामरगाव येथील चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीकडे सुपूर्त नगर तालुका पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

अहमदनगर दि.१३ डिसेंबर (प्रतिनिधी)
नगर तालुका पोलीस हद्दीतील कामरगाव येथील शामराव इंद्राजी आंधळे यांच्या राहत्या घरी ३ महिन्यापूर्वी दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाली होती. याबाबतची रीतसर फिर्याद त्यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला दिली होती.
दुपारची वेळ साधून टेहळणी करून चोरट्यांनी आंधळे यांच्या घरामागील दार तोडून ५ तोळ्यांच्या अंगठ्या, बोरमाळ इत्यादी सुमारे २ लाख ५० हजाराचे सोने व रोख रक्कम ५० हजार रुपये असा एकूण ३ लाखाचा ऐवज चोरून नेली होता. पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन ११ दिवसांत बाणखेल ता. आष्टी येथील चोरांच्या टोळीचा शोध लावला व चोरी गेलेल्या वस्तू व रोख रक्कम आरोपीकडून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार शामराव आंधळे यांना परत केली.
यावेळी खंडू बेरड, शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष सचिन बाजीराव कोतकर, राजेंद्र पोटे इत्यादी उपस्थित होते.
अल्पावधीतच पोलीस सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी चोरी गेलेला माल परत मिळवून दिल्याबद्दल कामरगाव येथील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सानप साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे व वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.