अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रमाणेच क्रीडा क्षेत्रात देखिल करिअरच्या मोठ्या संधी – किरण काळे
अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या यशस्वी खेळाडूंचा क्रीडा काँग्रेसच्या वतीने सत्कार

अहमदनगर दि.१७ जून (प्रतिनिधी ): पूर्वीपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या पाल्यांनी करिअर करावे असा पालकांचा आग्रह असतो. मात्र अलीकडील काळामध्ये या क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रात देखील करिअरच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधींचा उपयोग खेळाडू असणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या डब्ल्यूटीएसआरएफ ऑल इंडिया व कराटे चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवित यश मिळवणाऱ्या खेळाडूंची सत्कार किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अचिव्हर्स अकॅडमीच्या ओमकार शिवाजी नऱ्हे, रेहान मोहसिन पटेल, जिया मोहसिन पटेल यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम खेळाची कामगिरी करत कांस्य पदक पटकावले तर वेदांत नवनाथ जाधव, आदिती अशोक होले, श्रुती राजेंद्र मुद्दा यांनी रौप्य पदकाने पटकावले आहे.
या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक तथा राष्ट्रीय खेळाडू आदित्य क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले असून ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कराटेचा दैनंदिन सराव करीत आहेत. एमआयडिसी, बोल्हेगाव, आदर्श नगर, नवनागापूर, सावेडी गजानन कॉलनी आदी भागांतील खेळाडू मोठ्या संख्येने या अकॅडमीच्या माध्यमातून कराटेचे प्रशिक्षण घेत असून नगर शहराचे नाव उंचविण्याचे काम या माध्यमातून करीत आहेत.
पुणे येथे पार पडलेल्या शासनाच्या विभागीय क्रीडा प्रबोधिनी चाचणीमध्ये काँग्रेस क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक प्रवीण गीते पाटील यांच्या शिवराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या कु. राजनंदनी घाडगे हिची निवड झाली आहे. अकोले याठिकाणी पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये कु. राजनंदिनी ही नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कु. राजनंदनी व तिचे पालक यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तीच्या घवघवित यशाबद्दल यावेळी काळे यांनी कौतुक केले.
अशा प्रकारच्या संधींच्या माध्यमातून आज क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रामध्ये व्यावसायिक करिअर करण्याची संधी निर्माण झाली असून अन्य क्षेत्रां प्रमाणेच शिक्षणाबरोबरच याही क्षेत्रात करिअर होऊ शकते हे लफडं साठी उत्साह वाढविणारे असल्याचे काळे यावेळी म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव इम्रान बागवान, जिल्हा सचिव तथा ओबीसी काँग्रेसचे समन्वयक गणेश आपरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उषाताई भगत, राणीताई पंडित, ज्योतीताई जाजू,शारदाताई कर्डिले, मोमीन सय्यद, नेहा कूडिया, निर्मला कोरडे, राखी आहेर आदी उपस्थित होते.