नेवासे तालुक्याचे झुंजार नेते माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन!

नेवासे दि.३ डिसेंबर (प्रतिनिधी)
नेवासे तालुक्याचे झुंजार विरोधक, अभ्यासू नेते आणि, गरीबांचे तारणहार असलेले माजी आमदार, माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झालं असल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.
काल (दि. २) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना नगरच्या दवाखान्यात तात्काळ उपचारार्थ नेण्यात आलं.
दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नेवासा तालुक्यातील त्यांच्या पानसवाडी या मूळगावी अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माजी खासदार स्व. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झालेली आहे.