संगमनेर तालुक्यात झोपलेल्या चिमुकल्यावर मध्यरात्री बिबट्याचा प्राणघातक हल्ला!

संगमनेर प्रतिनिधी (४ नोव्हेंबर) -संगमनेर तालुक्यात झोपलेल्या चिमुकल्यावर मध्यरात्री बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली असून नागरिकांनी घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.आई वडीलासमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.ऊस तोड मजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यात यश आले असले तरी या चिमुकल्याची प्रकृती चितांजनक असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,साखर कारखाने सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ जळगाव येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊस तोड मजूराचे २० कुटुंब अड्डा करुन राहत आहेत.गुरुवारी दि.३ नोव्हेंबर रोजी हे ऊस तोड मजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने ऊस तोड मजूराच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला विरु अजय पवार (वय ३ वर्ष) याला जबड्यात घेऊन शंभर ते दिडशे फुटावर पलायन केले.त्यामुळे चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई वडीलासह शेजारील ऊस तोड मंजूरानी या बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली.या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र चिमुकल्याची प्रकृती खालवत असल्याने पहाटे ४ वा.त्याला अहमदनगर येथिल सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.दरम्यान मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी तिरावरील गावामध्ये बिबट्याचा हैदोस सुरु असून शेतकऱ्याच्या पशुधनासह नागरीकावर प्राणघातक हल्ले होत आहेत.परंतू कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून केल्या जात नाहीत.त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.वन विभागाकडून कोणत्याही आश्वासक उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे.बिबटे जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने आश्वी सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.