कायद्याची प्रभावी जनजागृती व समुपदेशनाच्या माध्यमातुन जनमानसांमधील वाद संपुष्टात येतील:जिल्हाधिकारी डॉ. राजेंन्द्र भोसले अखिल भारतीय जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा न्यायालयात कार्यक्रम संपन्न

अहमदनगर, दि. 01 नोव्हेंबर (प्रतिनिधी) – समाजामध्ये मालमत्ता, रस्ते यासह अनेक छोटे-छोटे वाद गैरसमजामधुन उदभवतात. अखिल भारतीय जनजागृती अभियानांतर्गत कायद्याच्या प्रभावी जनजागृतीबरोबरच जनमानसांमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातुन वाद संपुष्टात येऊन या अभियानाचा हेतू निश्चित साध्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी व्यक्त केला.
जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनजागृती यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय जनजागृती अभियानांतर्गत नागरिकांचे कायदेविषयक सबलीकरण याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वें. यार्लगड्डा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे , जिल्हा सरकारी वकील अॅड. सतिष पाटील,अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, सेंट्ल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किशोर देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागामध्ये गैरसमजातुन अनेक छोट-छोटे वाद उद्भवतात. हे वाद न्यायालयापर्यंत येतात. छोटछोटे असलेले वाद हे समूपदेशनाच्या माध्यमातून निश्चित निकाली निघु शकतात. यासाठी न्यायालयासोबत सर्व विभागांच्या सहकार्याने अशी प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी कृती आराखडा तयार करून मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आर्मी जवानांचे असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “अमृत जवान सन्मान अभियान” जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 683 रस्त्यांचे असलेले प्रश्न निकाली काढण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले की, सर्वांना न्याय हे ब्रीद वाक्य घेऊन न्याय विभागामार्फत न्याय दानाचे काम करण्यात येते. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील गावोगावी कायद्याबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. येणा-या काळातही अशाच प्रकारच्या कार्यक्रमातून खटलापूर्व प्रकरणाबाबत सर्व विभागांच्या सहकार्यातुन व्यापक स्वरूपात व अधिक उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करून ते राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, कायद्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाद्वारे सातत्याने करण्यात येत असुन या कामामध्ये पोलीस विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनीहीमनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विषद केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अहमदनगर बार असोसिएशनच्या सदस्या अॅड अनुराधा येवले यांनी केले तर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सदस्या अॅड. स्वाती नगरकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास न्यायिक विभागातील अधिकारी तसेच विधिज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.