जिल्हा परिषदेच्या गट व गणाची लवकर फेररचना-पालकमंत्री मुश्रीफ
अहमदनगर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी चे वातावरण लवकरच तापणार असून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या पुनर्रचनेसाठी विधानसभेत चर्चा करण्यात आली. त्याबाबत कायदा संमत करण्यात आला. येत्या आठ दिवसांत याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येणार असून त्याप्रमाणे आयोग सुधारित लोकसंख्येनुसार गट आणि गणाची पुनर्रचना करणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट आणि गण रचना ही 2011 च्या लोकसंख्येवर आधारित आहे. मात्र, राज्य सरकारने सध्याच्या लोकसंख्येनुसार गट आणि गणाची पुनर्रचना व्हावी, यासाठी कायदा केलेला असून त्यासाठी काही नियम बनवले आहेत. यामुळे विद्यमान गट आणि गणाच्या संख्येत वाढ होणार आहे. गट आणि गणाच्या पुनर्रचनेच्या कायद्याची माहिती येत्या सात ते आठ दिवसांत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग गट आणि गणाची सुधारित पुनर्रचना करतील, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यांत ओबीसी आरक्षणासह निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक घेतली असून त्यांच्याकडून किती दिवसांत इम्पेरिकल डेटा मिळेल, आणि त्यानुसार ओबीसी आरक्षणाचा निर्णय हाेईल. सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीनंतर याबाबत अधिक चित्र स्पष्ट होणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले