सण आणि उत्सव ही भारतीय संस्कृतीची प्रतिके : सीईओ- विक्रांत मोरे स्नेहबंध आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- सण आणि उत्सव ही भारतीय संस्कृतीची प्रतिके आहेत. यामुळे एकमेकांशी ऋणानुबंध वाढतात. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशन आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांचा पैठणी, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी मोरे बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, शोभाताई भंडारी, भंडारी सप्ल्यायर्सचे संचालक रुपेश भंडारी, छावणी परिषदेच्या कार्यालय अधीक्षक स्नेहा पारनाईक, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, अमोल कुलट, साई ट्रॉफीचे संचालक सचिन पेंडुरकर, तुषार घाडगे उपस्थित होते.
शोभाताई भंडारी म्हणाल्या, अशा स्पर्धांद्वारे महिलांना घरची कामे करताना मनस्वी आनंद होतो. आपल्या कार्याचा कोणीतरी गौरव करतो, याचा अभिमान वाटतो. स्नेहबंध फाउंडेशन महिलांसाठी असे उपक्रम राबवत आहेत यानिमित्त त्यांचे आभार मानते.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले,
युवती व महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक वृषाली शेंडगे, द्वितीय प्रियंका तोतरे, तृतीय रूपाली बाबर यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक निशा गोसावी, शितल कांबळे, सुचिता भावसार यांना देण्यात आले. विजेत्यांना पैठणी व सन्मानचिन्ह रुपेश भंडारी यांच्याकडून देण्यात आले.