प्रशासकिय

जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा! आतापर्यंत जिल्ह्यात ५६२.९ मि.मी मध्ये १२५.६ टक्के पाऊस!

अहमदनगर, २७ सप्टेंबर (प्रतिनिधी) – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात २८ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३९६२ क्यूसेस व जायकवाडी धरणातून ९४३२ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे १३०७६ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून ४९०० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८१४ क्युसेस व ओझर बंधारा १०९३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ५६२.९ मि.मी. (१२५.६ %) पर्जन्यमान झालेले आहे. वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल् हयातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४/२२५६९४० वर संपर्क साधावा. असे आवाहनही पल्लवी निर्मळ यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे