दंतविकार जडू नयेत, म्हणून फळे खाण्यावर भर द्या : कळकुंभे स्नेहबंध व बूथ हॉस्पिटलतर्फे सावेडी येथील मूकबधिर विद्यालयात दंत तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांमध्ये दंतविकाराचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे. दंतविकार जडू नयेत, म्हणून विद्यार्थ्यांनी फळे आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर विशेष भर द्यावा. जंक फूड खाणे टाळता येत नसेल तर ८ दिवसांतून एक दिवसच खावे, व्यवस्थित ब्रश करावा, असे प्रतिपादन इ. बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे यांनी केले.
स्नेहबंध फौंडेशन व बूथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग संजीवनी सोसायटी संचलित सावेडीतील मूकबधिर विद्यालय व वसतिगृह दंत तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह निमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, मुख्याध्यापक डी. के. जगधने, एस. आर. ढाकणे, आर.बी.भांड, सौ.भोंडवे एस.एस.,श्रीमती जेजुरकर एस.ए., दंत चिकित्सक डॉ. ममता कांबळे,
जॉन वेनॉन, प्रवीण साबळे आणि परिचारिका उपस्थित होते.
दात चांगले असतील तर खाल्लेले अन्न चांगले चर्वण करता येते. परिणामी, पचनक्रिया चांगली राहते. दात व्यवस्थित असतील तर चेहराही फुलून दिसतो. विद्यार्थ्यांनी कर्तव्य धर्म, संयम धर्माचे पालन केल्यास ते जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे यावेळी म्हणाले. या शिबिरात दंत चिकित्सक डॉ. ममता कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वसतिगृह व विद्यालयातील ६५ मुलांची दंत तपासणी करण्यात आली.