क्रीडापटूंसाठी देशात स्वतंत्र क्रीडा विद्यापीठं निर्माण करण्याची गरज – किरण काळे अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी ): देशातल्या शैक्षणिक संस्थांना नियंत्रित करणारी शैक्षणिक विद्यापीठ सुरुवातीपासून कार्यरत आहेत. ऑलम्पिक मान्यता, केंद्र व राज्य शासन मान्यता असणारे अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत. मात्र या सर्व क्रीडा प्रकारांना, क्रीडापटूंना खेळासाठी अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या खेळांचे योग्य प्रकारे मूल्यमापन करीत खेळाडूंच्या करिअरसाठी याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने देशात ठिकठिकाणी स्वतंत्र क्रीडा विद्यापीठं निर्माण करण्याचा धोरणात्मक निर्णय देशपातळीवर घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.*
अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने शहरात कराटे बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण खेळाडूंच्या बेल्ट वाटप व गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी काळे बोलत होते. यावेळी अहमदनगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीण गीते, मुख्य परीक्षक तथा ट्रेडिशनल शोतोकान अँड स्पोर्ट्स कराटे ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे सदस्य सेन्सई रवींद्र कराळे (बारामती), स्पर्धा परीक्षक तथा अंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू सेन्सई प्रीतम इचके (पिंपरी चिंचवड), अहमदनगर तायक्वांदो असोसिएशनचे सचिव घन:श्याम सानप, अहमदनगर कराटे असोसिएशनचे सचिव अमोल काजळे, अकॅडमीचे क्रीडा प्रशिक्षक सेन्सेई आदित्य क्षीरसागर, सेन्सई सुरज गुंजाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काळे म्हणाले की, विद्यार्थी दशेतच मुले वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत असतात. भारतीय शिक्षण पद्धतीप्रमाणे शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांना पूर्ण करावेच लागते. मात्र ते करत असताना खेळासाठी अधिक वेळ दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते असा पालकांचा समज आहे. त्यामुळे खेळासाठी अधिक वेळ देणाऱ्या खेळाडूंना न्याय मिळण्याच्या दृष्टीने स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ निर्माण करीत प्रत्येक खेळाडूला या विद्यापीठाच्या माध्यमातून खेळाडू खेळत असलेल्या खेळाच्या संदर्भात त्यांना स्वतंत्र सर्टिफिकेशन देण्याची गरज आहे. या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून क्रीडा प्रकारासाठी दिल्या जाणाऱ्या गुणांची टक्केवारी वाढवण्याची गरज आहे.
शालेय परीक्षांच्या मार्कशीटमध्ये क्रीडा गुणांना ग्राह्य धरत असताना आजरोजी खेळासाठी अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या गुणांची टक्केवारी अशाप्रकारे अधिक वाढविल्यास खेळाडूंना देखील खेळासह इतर क्षेत्रातील करिअरच्या अधिक व मोठया संधी देखील मुबलक प्रमाणात मिळू शकतील. तसेच शासकीय सेवांमध्ये देखील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. तसेच क्रीडा विद्यापीठाचे सर्टिफिकेशन असणाऱ्या खेळाडूंना इतर खाजगी व शासकीय नोकऱ्यांमध्ये सेवेत असताना विशेष सुविधा देखील देण्याची गरज आहे. जेणेकरून सेवेत असताना देखील ते त्यांचा खेळ कायम सुरू ठेवू शकतील, असे यावेळी बोलताना काळे म्हणाले.
रवींद्र कराळे म्हणाले की, आम्ही राज्यस्तरावर कराटे संघटनेचे काम करतो. मात्र नगरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कराटेसाठी काम सुरू असून नगरचा राज्यातील स्पर्धांमध्ये पदके पटकविण्यामध्ये टक्का हा कायम अधिक असतो.ही नगरसाठी अभिमानाची बाब आहे. घन:श्याम सानप म्हणाले की, नगर शहरामध्ये खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज आहे. प्रवीण गीते म्हणाले की, शहरात खेळाडूंची संख्या मोठी आहे. क्रीडा क्षेत्राला चांगल्या प्रकारे बळ मिळाल्यास नगर मधून भविष्यात अनेक मोठे खेळाडू राज्य व देशाला मिळू शकतील.
*अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कराटे बेल्ट स्पर्धेमध्ये एकूण १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. येलो बेल्ट परीक्षेत ४८, ऑरेंज बेल्ट परीक्षेत २६, ग्रीन बेल्ट परीक्षेत ६, ब्लू बेल्टमध्ये ८, पर्पल बेल्टमध्ये १० तर ब्राऊन बेल्ट परीक्षेत ४ खेळाडू या परीक्षेच्या माध्यमातून यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. अचिव्हर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या बालाजी नगर (बोल्हेगाव), सनफार्मा विद्यालय (एम.आय.डी.सी.), आदर्श नगर (नागापूर), सावेडी गाव या चार शाखांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. उत्तीर्ण खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज गुंजाळ यांनी केले. तर आभार आदित्य क्षीरसागर यांनी मांडले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.