फायनान्स कंपन्यांच्या वसुली पथकांप्रमाणे आता पाणीपुरवठा खाजगी ठेकेदाराच्या टोळ्या नागरिकांच्या दारात मनपा पाठवणार का ? किरण काळेंचा अतिरिक्त आयुक्तांना संतप्त सवाल ; रस्ते विकासासाठी, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी अभिनव खाजगीकरण योजना राबवण्याचा काँग्रेसचा मनपाला सल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी ): मनपाच्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरण प्रस्तावाला विरोध जाहीर करणाऱ्या काँग्रेस शिष्टमंडळाने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळीच अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मनपाच्या या प्रस्तावा बाबत अनेक आक्षेप उपस्थित करीत कडाडून विरोध करण्यात आला. फायनान्स कंपन्यांच्या वसुली पथकांप्रमाणे आता पाणीपुरवठा खाजगी ठेकेदाराच्या टोळ्या नागरिकांच्या दारात मनपा पाठवणार का ? असा संतप्त सवाल यावेळी अतिरिक्त आयुक्तांना काळे यांनी विचारला. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना काँग्रेसने या प्रस्तावाला जनहितार्थ काँग्रेसचा विरोध असल्याचे लेखी निवेदन दिले.*
मनपा आयुक्त पंकज जावळे हे मुंबईला असल्यामुळे कॉंग्रेस शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे रोहिदास सातपुते, सहाय्यक आयुक्त बांगर, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, राकेश कोतकर, मेहेर लहारे आदी अधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसने अतिरिक्त आयुक्तांसमोर पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचा वाचला पाढा :
वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी पाणीपट्टी भरणाऱ्या नगरकरांना केवळ निम्मेच दिवस म्हणजे सुमारे १५० दिवसच पाणी मिळते. मात्र मनपा ३६५ दिवसांसाठी मोठ्या रकमेची पाणीपट्टी आकारते.
ज्या भागात दर ८ दिवसांनी पाणी येते अशा भागांना महिन्यातून केवळ ४ वेळा आणि वर्षातून सुमारे ४५ ते ५० वेळाच पाणी मिळते.
सारसनगरसह शहराच्या अनेक भागांमध्ये आजही टँकरने पाणीपुरवठा होतो. नगर शहरा जवळील हिवरे बाजारसारखे गाव आज टँकरमुक्त असताना नगर शहर मात्र टॅंकरवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. हे शहराचे दुर्दैव आहे.
पाणी येण्याच्या वेळा देखील नागरिकांच्या, विशेषतः महिला वर्गाच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीच्या आहेत. अनेक वेळा रात्री, अपरात्रीच्या सुद्धा असतात.
बराच वेळा तर मैला मिश्रित पाणी सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या नळांमधून वाहते. यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो.
शहरामध्ये गटारीच्या पाण्यामधून पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या आहेत.
पाणी वाटपामध्ये देखील प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप पाहायला मिळतो.
किरण काळे यांनी केले मनपावर गंभीर आरोप :
शहर पाणीपुरवठा योजना खाजगीकरणाचा प्रस्ताव राजकीय वरदहस्तातून तयार झाला आहे.
मोठ्या रकमेचा ठेका तयार करण्याचा घाट घातला जात असून आपल्या बगलबच्चा कार्यकर्त्यांच्या घशात याचा मलिदा घालण्यासाठी आणि स्वतःही हा मलिदा खाण्यासाठी खाजगीकरण करण्याचा डाव आहे. यांना एवढ खाऊन अजीर्ण कसं होत नाही हाच मोठा प्रश्न आहे.
महापालिकेचे अधिकारी जरी यामध्ये समोर दिसत असले तरी देखील यामागचे पडद्या आडून असणारे खरे सूत्रधार हे राजकीय पुढारीच आहेत.
शहरातील टुकार कार्यकर्ते खाजगीकरणातून गोळा केल्या जाणाऱ्या पैशांवर पोसले जाणार असून पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांच्या दारामध्ये मात्र फायनान्स कंपन्यांच्या टोळ्यांप्रमाणे टुकार कार्यकर्त्यांच्या टोळ्या गणवेश घालून आणि गळ्यात आयकार्ड लटकवून यांना वसुलीसाठी यांना पाठवायचे आहेत .
काँग्रेसने खाजगीकरणाला केलेल्या विरोधानंतर आता “आम्ही ते नाहीत” हे दाखवण्यासाठी याच राजकीय पुढार्यांचे बगलबच्चे, नगरसेवक पुढे येऊन या प्रस्तावाला विरोध करतील, असे भाकीत किरण काळे यांनी केले आहे.
.. तर राजीनामे द्या :
यांना जर महापालिका चालवता येत नसेल तर राजीनामे देऊन यांनी पायउतार व्हावे. काँग्रेस जनहित जोपासणारे सक्षम नगरसेवक देईल आणि अधिकाऱ्यांकडून लोकहिताची कामे करून घेईल. शहरातील पुढार्यांनीच महापालिकेचे वाटोळे केले असून भ्रष्ट पुढारी ही अहमदनगर मनपाला आणि शहराच्या विकासाला लागलेली कीड असल्याचा घाणाघात किरण काळे यांनी केला आहे.
काँग्रेसच्या उद्याच्या निविदेबद्दल उस्तुकता :
आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी उपासात्मक निविदा काँग्रेस प्रकाशित करणार असल्याचे किरण काळे यांनी जाहीर केले आहे. सोमवारी मनपात आक्रमक झालेली काँग्रेस मंगळवारी आपल्या निवेदेत नेमक काय प्रसिद्ध करते याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. काँग्रेसने पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाच्या विरोधाच्या घेतलेल्या भूमिकेचे मात्र शहरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होताना पाहायला मिळत असून काँग्रेसच्या या मागणीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
आयुक्त साहेब, “त्या” विधवा भगिनीवरील अन्याय दूर करा :
यावेळी किरण काळे यांनी केडगावच्या विधवा भगिनी लता नारायण कोरे यांना मनपाने रु. १ लाखाची पाणीपट्टी बिल दिल्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या भगिनीला मनपा प्रशासनाने मानसिक त्रास दिला असून यामुळे त्या हैराण झाल्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर भगिनी कडून मनपाने वसुली करू नये, अशी मागणी यावेळी काळे यांनी आयुक्तांकडे केली. अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करत चुकीची वसुली केली जाणार नाही असे स्पष्ट केले. काँग्रेसच्या पुढाकारातून यामुळे सदर महिलेला एक लाख रुपयांची पाणीपट्टी विनाकारण भरण्याच्या मनपाच्या जाचातून सुटका मिळाली आहे.
खड्डे रहीत रस्ते विकासासाठी जनहितार्थ काँग्रेसचा मनपाला सल्ला :
शहरातल्या रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. एन गणेशोत्सवाच्या काळात देखील मनपाला साधे खड्डे सुद्धा बुजवता येऊ शकलेले नाहीत. शहर पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्याबाबतची अभिनव कल्पना अंधारातून व पडद्या आडून मार्गदर्शन करणाऱ्या राजकीय पुढार्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महानगरपालिकेच्या प्रतिभावान अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पुढे आली त्या प्रतिभावान अधिकाऱ्यांना नगर शहरातील खड्डे बुजवणे, शहरातील रस्ते वर्षानुवर्ष टिकतील अशा दर्जेदार पद्धतीने विकसित करणे यासाठी आपल्या कल्पकतेतून, अभिनव अशा नाविन्यपूर्ण विचारातून खाजगीकरणाचा विशेष प्रकल्प तयार करून त्याचा एखाद्या खाजगी कंपनी मार्फत सर्व्हे करून असा प्रस्ताव महासभे समोर ठेवावा.
माञ नगरकरांना तेवढे दर्जेदार व खड्डे नसणारे रस्ते द्या. या प्रस्तावाला काँग्रेस विरोध न करता जनहितार्थ नक्कीच जाहीर पाठिंबा देईल असे किरण काळे यांनी यावेळी आयुक्तांना म्हटले आहे. मात्र अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करताना शहरात जागोजागी टोल वसुली केंद्र बसवून त्या ठिकाणी टोल वसुली करणाऱ्या राजकीय पुढार्यांच्या टुकार टोळ्या जनतेच्या खिशांवर धाडी घालणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यावी, असा खोचक सल्लाही यावेळी आयुक्तांना द्यायला काळे विसरलेले नाहीत.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक फैयाज शेख, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, माजी नगरसेविका जरीना पठाण, डॉ. जाहिदा शेख, शैला लांडे, हलीमा शेख, अभिनय गायकवाड, इंजिनियर सुजित क्षेत्रे, गौरव कसबे, गणेश आपरे, इमरान बागवान, शंकर आव्हाड, राजू साळवे, गौरव घोरपडे, उमेश साठे, बिभीषण चव्हाण, शेख मोहम्मद हनीफ, प्रशांत जाधव, रियाज शेख अधीक्षक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.