राजकिय

दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या विधवा महिलेला रू. १ लाखाचे पाणीपट्टी बिल देणाऱ्या नगर मनपाच्या कारभाराची किरण काळेंनी फेसबुक लाईव्हद्वारे केली पोलखोल मनपाच्या गलथान कारभारामुळे मानसिक धक्का बसलेल्या विधवा भगिनीची किरण काळेंनी भेट घेत दिला आधार

अहमदनगर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेने एका मागे एक खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. शहर पाणीपुरवठा योजना खाजगी ठेकेदाराच्या खुंटीला बांधण्याचा घाट घालत असलेल्या मनपाच्या या खाजगीकरण प्रस्तावाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यातच नागरिकांची मनपा कशाप्रकारे पिळवणूक करते आहे याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या केडगावमधील एका विधवा महिलेला पाणीपुरवठा विभागाने चक्क थोडीथिडके नव्हे तर सुमारे रु.१ लाखाचे पाणीपट्टी बिल दिले आहे. अजब नगर मनपाच्या या गजब गलथान कारभाराची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जबर मानसिक धक्का बसलेल्या सदर महिलेच्या घरी भेट देत धीर देऊन या धक्कादायक प्रकाराची फेसबुक लाईव्हद्वारे चांगलीच पोलखोल केली आहे.*
दरम्यान सोमवारी मनपा आयुक्तांशी याबाबत चर्चा करून न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन सदर महिलेला काळे यांनी दिले आहे. काळे यांनी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रभावतीताई सत्रे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह केडगाव देवीजवळ राहणाऱ्या लताताई नारायण कोरे यांची भेट घेत घडला प्रकार समजून घेतला. यावेळी काळे यांनी फेसबुक लाईव्ह करून महापालिकेच्या गलथान कारभाराचे सोशल मीडियातून चांगलेच वावडे काढले. यावेळी लताताई कोरे यांनी देखील त्यांच्या समवेत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांसमोर मांडला आहे.
विशेष म्हणजे ज्या मालमत्तेचे कोरे यांना बिल प्राप्त झाले आहे त्या प्रभागात त्यांच्या नावे कुठलीही मालमत्ता नाही. तरी देखील मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने कोरे यांची बुरूडगाव रोड परिसरात प्रभाग क्र.४, वॉर्ड नं.३० मध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसताना सुमारे रु. १ लाख रुपयांची थकबाकीचे बिल दिले आहे. त्यामुळे पुरत्या घाबरलेल्या कोरे या अक्षरशः आजारी पडल्या आहेत. त्यांनी याबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे जाऊन विचारणा केली. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनाच उडवा उडवीचे उत्तरे दिली. काळे यांनी कोरे यांना विनाकारण मनस्ताप देत त्रास देणाऱ्या मनपा प्रशासनाचा काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कोरे या विधवा असून आपली उपजीविका चालविण्याकरिता अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांचे बुडगाव रोड परिसरात कुठल्याही प्रकारचे घर, प्लॉट अगर मालमत्ता नसताना १ एप्रिल २०२२ ची चालू वर्षाची पाणीपट्टी रू. १५०० व पाठीमागील थकबाकी रू. ९४ हजार २७४ अशी रू. ९५ हजार ७७४ रुपयांची पाणीपट्टीचे बिल दिले आहे. कोरे यांना पाठवलेल्या बिल क्रमांक २२२३४०००६९४ असलेल्या बिलामध्ये नळ जोडणी क्र. ४३०००००५६५ असा असून नळ जोडणी प्रकार ०.५०, वापराचा प्रकार, ग्राहक घर, मालमत्ता क्रमांक निरंक, फ्लॅट नंबर निरंक असा दर्शवून नळ जोडणीचे ठिकाण प्रभाग स.क्र. ४,वार्ड क्र.३० असे नमूद केलेले आहे.
घराचा वार्षिक दर रू. १५०० दर्शवून मागील थकबाकी ३२ हजार ०८४ दर्शविली असून त्यावर रू. ६२ हजार १९० इतकी दंडात्मक रक्कम असून एकूण बिल रक्कम रु. ९४ हजार २७४ आणि चालू कर रू. १,५०० असे मिळून एकूण येणे बाकी रू. ९५ हजार ७७४ इतकी रक्कम दर्शवून या बीलाचा कालावधी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ असा दर्शविला असून मनपाने कोरे यांच्याकडे ही बिलाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कोरे यांचे खरे घर आहे त्या घराची पाणीपट्टी रक्कम रु. २,१४८ इतकी असून त्यांनी ती पूर्ण भरलेली आहे.
त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसताना ही त्यांना मनपाने सुमारे एक लाख रुपयांची मागणी केली आहे. यामुळे नगरकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून शहरातील इतर नागरिकां समवेत देखील असे प्रकार घडले असण्याची शक्यता असून अशा नागरिकांनी पुढे येत महापालिकेकडे याची तक्रार करावी असे आवाहन किरण काळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे