कर्जत तालुक्यातील सर्व प्रमुख ठिकाणी “सामूहिक राष्ट्रगीत” गायन

कर्जत( प्रतिनिधी)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिम्मित ९ ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने बुधवार, दि १७ रोजी सकाळी ठीक ११ वाजता देशात सर्वत्र “सामूहिक राष्ट्रगीत गायन” पार पडले. यावेळी कर्जत शहर आणि तालुक्यातील सर्व शासकीय विभाग, शाळा- महाविद्यालय यासह सार्वजनिक ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायले गेले. शहरातील दादा पाटील महाविद्यालयात प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, प्राचार्य डॉ संजय नगरकर यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि विक्रमी संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ थोरबोले म्हणाले की, आजच्या भारताचे खरे बलस्थान युवाशक्ती असून त्यांनी आपल्या कुवतीने देशाच्या सर्वागीण विकासासाठी कायम तत्पर राहणे आवश्यक आहे. आपण भारत देशात जन्म घेतला आणि भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपणा सर्वाना साजरे करण्याचे भाग्य लाभले आहे. भारत देश आणि तिरंगा ध्वज प्रती अभिमान राखत आदर करावा.
प्राचार्य डॉ संजय नगरकर म्हणाले की, प्रत्येक युवकांने केवळ एका दिवसासाठीच राष्ट्रप्रेम जागरूक न ठेवता कायम देशसेवेसाठी पुढे आले पाहिजे. भारत देशासाठी आणि तिरंगाप्रती कायम सन्मान राखणे आवश्यक आहे असे म्हंटले. शेवटी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सर्वाचे आभार व्यक्त करीत धन्यवाद मानले.