डाळिंबाची बाग चोरट्यांनी लुटली! श्रीगोंदा तालुक्यातील घटना शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान!

श्रीगोंदा( प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारातील रमेश दत्तात्रय साळवे यांच्या डाळिंबाच्या बागेतील फळे अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली.या घटनेत साळवे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याप्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लोणी व्यंकनाथ येथे साळवे यांच्या शेतात डाळिंबाची ३०० झाडे आहेत.साळवे यांचे डाळिंब काढणीला आले होते.साळवे कुटुंबीय नियमितपणे रात्रीची या बागेची राखण करीत होते.मंगळवारी (दि.४) रात्री दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा दिगंबर साळवे हा शेतात जाऊन आला होता.परंतु त्यानंतर सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फायदा घेत अज्ञातांनी साळवे यांच्या बागेतील डाळिंबाची फळे तोडून नेली.मंगळवारी सकाळी शेतात गेल्यानंतर ही बाब साळवे यांच्या लक्षात आली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करीत आहेत.