कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे-माणिकडोह बोगद्याला शासनाची मान्यता:आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश

कर्जत (प्रतिनिधी): दि २९ जून
कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह या बहुप्रतिक्षीत बोगद्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार असून यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरिक्त आवर्तन मिळणार आहे.
डिंभे-माणिकडोह बोगदा करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार रोहित पवार हे त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या बोगद्याला मान्यता दिली आहे. या बोगद्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यातील सर्वांत लांब अशा कुकडी डावा कालव्याला एक जादा आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांचा पाण्याचा कोटा अबाधित राहणार असून त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणामध्ये साठविण्यासाठी या बोगद्याचा उपयोग होईल. माणिकडोह धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस पडत असल्याने साधारणपणे हे धरण पाच वर्षांतून एकदाच भरते. परंतु या बोगद्यामुळे डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरीक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून माणिकडोह धरणात साठवण्यात येणार आहे. त्यामुळे हे धरण दरवर्षी भरणार असल्याने पुढील काळात कुकडी प्रकल्पासाठी पाणी कमी पडणार नाही. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आमदार रोहित पवार हे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने दरवर्षी एक अतिरीक्त आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.