पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक : पोलीस अधीक्षक मनोज पाटील

अहमदनगर दि.२७ जून (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
नगर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात स्नेहबंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, शिल्पकर बालाजी वल्लाल उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे.
*****पर्यावरण जगले तरच पिढी जगेल
प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत आहे. अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे. वेळीस सजग होऊन याकडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पर्यावरण जगले तरच पिढी जगेल, असेच नाही स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले.