कर्जत तालुक्यातील चिलवडी आणि होलेवाडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस

कर्जत (प्रतिनिधी) : दि २६
कर्जत तालुक्यातील राशीन परीसरात चिलवडी आणि होलेवाडी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने बेलोरा ओढा ओसंडून वाहिला. वीज पडून एक बालिंगा मृत्युमुखी पडला असून दुपारी ३ ते ५ या दोन तासांच्या कालावधीत पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर बंधारे वाहू लागले.
रविवारी दुपारी ३ च्या सुमारास राशीन परिसरात चिलवडी आणि होलेवाडी शिवारात तब्बल दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसाने चिलवडी येथील बेलोरा ओढा ओसंडून वाहिला. तर परिसरातील अनेक बंधाऱ्यात चांगला जलसाठा साचला. दादा पांडुरंग शिंदे या शेतकऱ्यांच्या बालिंग्यावर वीज पडून तो जागीच गतप्राण झाला. यासह रविवार, दि २६ रोजी कर्जत तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सर्व ठिकाणी पडलेल्या पेरणी योग्य पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.