महिला ग्रुपच्यावतीने कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा

कर्जत (प्रतिनिधी ):
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण. परंतु रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही उत्सव! पोलिसांना शांतता-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या कामावरच ‘ऑन ड्युटी’ हजर रहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत आणि परिवारासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करता येत नाही. मात्र कर्जतमधील अनेक महिलांनी अचानक पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह अनेक पोलीसदादांना राखीचे बंधन बांधून बहीण-भावाच्या प्रेमाचा आल्हाददायक गारवा दिला. पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह अनेक पोलीस बांधवांनी शहरातील बहिणींच्या रक्षणासाठी योग्य ती कारवाई करत असून काहीही तक्रार असेल तर संपर्क करण्याबाबत सांगितले.
कर्जत पोलिसांनी कर्जत शहरात निर्माण केलेली शांतता- सुव्यवस्था, गुन्हेगारीवर बसवलेला आळा,शाळा-महाविद्यालयातील मुलींना दिलेले संरक्षण, सर्वसामान्यांची सावकारकीच्या पाशातून केलेली सोडवणूक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा, सुरळीत केलेली वाहतूक व्यवस्था आदींबाबत कर्जत पोलिसांनी केलेल्या कामांचे या भगिनींनी कौतुक केले. चांगल्या कामाचे सर्वसामान्य जनतेतून नेहमी कौतुक होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शाळा कॉलेजवर जाऊन भेटी देऊन आपला मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला. खूप साऱ्या छोट्या मोठ्या तक्रारींचे निवारण केले. तसेच पोलीस ठाण्याची मुलींना सहल घडवून आणली. शहरात आणि बस स्थानकातील रोड रोमियोंवर कारवाई केली. या सर्व गोष्टींमुळे मुली आणि महिलांची पोलिसांविषयी असलेली भीती कमी झालेली आहे आणि आम्ही कोणत्याही ठिकाणी निर्भयपणे वावरत असल्याबाबत सांगितले. तसेच गोदड महाराज रथयात्रे सुद्धा महिला मोकळ्या मनाने फिरल्या आणि यात्रेचा यात्रेचा आस्वाद घेतला असल्याचे सांगितले. महिला-भगिनींनी राख्या बांधल्यानंतर पोलिस अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे भगवान शिरसाट, कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस जवान व कर्जत शहर – परिसर आणि रवळगाव येथील स्वाती पाटील, मनिषा सोनमाळी, शबनम मुंढे, माधुरी कल्याणकर, वैशाली टकले सुनिता घालमे, आश्विनी घेरडे, शिल्पा माळवे, पुष्पा शिंदे, अलका शिंदे, शिफा शेख आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.
****** आज असंख्य बहिणी मिळाल्याचा आनंद
“कामामुळे अनेकदा आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. आज शहरातील महिला-भगिनींनी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.”